लेबले (टॅग्ज)
मला युरोपचं पहिल्यापासून आकर्षण!!! कारण माहीत नाही पण युरोपिअन देश आणि त्यातही इंग्लंड माझ्या आकर्षणाचं केंद्र होतं आणि आहे. शाळेत शिकवलेल्या इतिहासामुळे म्हणा किंवा वाचलेल्या कादंबर्यांमुळे म्हणा युरोपला आणि त्यातही इंग्लंडला जाणे माझे स्वप्न होते. शेरलॉक होम्स, रॉबिन हूड, मोठेपणी डिकन्सच्या कादंबर्या आणि बीबीसीवर दाखवलेले सुंदर कार्यक्रम आणि त्यातून दिसलेली सुंदर गावं ह्यामुळे आपण इंग्लंडलाच जायचं असच ठरवलं होत.
देवाची कृपा म्हणा, नशीब म्हणा किंवा काहीही, पण एक दिवस मला आमच्या मॅनेजरने विचारलं, “यू. के. चा प्रोजेक्ट आहे, ६ महिन्यांसाठी जावंही लागेल. जाणार का? ” मला माझी पहिली परदेशवारी इंग्लंडमध्येच करायला मिळाली. मी एकदम हरखून गेलो. आयुष्यात कधीच परदेशात गेलो नव्हतो, जे जाऊन आलेत त्यांचे फोटो बघत तहान ताकावर भागवत होतो. जे इतके दिवस अशक्य वाटत होत ते एकदम प्रत्यक्षात येणार होतो अन त्यामुळे मी एकदम हवेतच गेलो. घरी आल्यावर बातमी दिली तर घरच्यांनाही आनंद झाला. बायकोलासुद्धा छान वाटलं, पण ती बाळंतपणासाठी माहेरीच होती त्यामुळे भेटता येणार नाही ह्याचं थोडं दु:ख वाटलं.
प्रोजेक्टवर मी रीतसर ऑन बोर्ड झालो. इंग्लंडातील आमच्या प्रोजेक्ट लीडने माझी चाचणी सुद्धा घेतली. ४-५ दिवसात सगळा प्लॅन ठरला. माझ्याबरोबर अजून ४ जण होते. मी पुण्याचा, २ नोइडातून, १ चेन्नई आणि १ बंगळूर मधून. आम्ही सगळा तपशील वकिलातीच्या फॉर्म्सवर भरून पाठवून दिला आणि ४ आठवड्यांनी व्हिसा येणार ह्या हिय्याने तयारी सुरू केली. पाहता पाहता एक महिना गेला.. आमचा मॅनेजर अस्वस्थ झाला आणि त्याने व्हिसा का आला नाही म्हणून प्रश्नांचा भडिमार चालू केला. आम्हाला तरी कुठं काय माहीत होत? आम्ही फॉर्म्स नीट भरलेत हे वारंवार विनवून सांगण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. अखेरीस तो व्हिसा आला आणि आमचा जीव भांड्यात पडला… पण तो भांड्यात पडतो ना पडतो तोच आमचा मॅनेजर पेटला तुम्ही मिळेल ते लवकरातलं तिकिट काढून पळा अस आमच्या मागे लागला… अखेर चर्चा, उपचर्चा, वाद इ. इ. होऊन आम्ही चार दिवसांनी जायचं अस ठरलं. लगेचच तिकिटे बुक होऊन आम्ही ११ सप्टेंबरला प्रयाण केले. आंतर-राष्ट्रीय विमान प्रवासाचा पहिलाच अनुभव (आणि नुसत्या विमानप्रवासाचा दुसराच!! ), त्यामुळे सगळ्या गोष्टीचं अप्रूप.. त्या निळ्या डोळ्यांच्या सुंदऱ्या आणि सुंदर, त्यातच आपले भारतीय सायब लोक. त्या भारतीय सुंदऱ्या हिंदीतून सूचना द्यायला लागल्यावर मला त्या निळ्या डोळ्यांच्या इंग्रज बायका पार्श्व-आवाज देतायत का काय अशी शंका आली. तसेच ते सुंदर, इंग्रजी वळणाने हिंदी बोलत होते. मी आपला, त्यांच्यापेक्षा गोर्यांशीच जास्त बोलत होतो (म्हणजे कारणापरत्वेच!! उगाचच टाईमपास नाही). आमचे ब्रिटिश एअरवेजचे विमान अखेर उड्डाणाच्या तयारीला लागले. आम्ही तत्परतेने आमच्या खुर्च्यांच्या “पेट्या” बांधल्या. हे पेटी प्रकरण मला नीट कळलं नाही… पट्ट्याला हे पेटी का म्हणतात? असो. तोच विचार करत मी मागे मान टेकली आणि डोळे मिटले.
थोड्यावेळाने मला जाग आली तर भारतीय सुंदरी मला “चाय-पानी विचारत होती”. मी आपला कोलोन वॉटरचा टुवाल घेतला आणि तोंड पुसलं. बेचव चहा कॉफी प्यायची माझी तयारी नव्हती.. मग बीर घेतली
विमान दुपारी निघाल होतं, त्यामुळे बाहेर उजेड होता.. विमानातील माहीतीप्रक्षेपकाने अफगाणिस्तानावरून विमान जात असल्याच सांगितलं. मी लगेच मागच्या मोठ्या खिडकीकडे गेलो आणि वाकून खाली हिंदुकुश पर्वत वगैरे शोधू लागलो.. साधारणतः अर्धा तास हा चाळा चालू होता.. शेवटी मुकाट जागेवर येऊन बसलो आणि डुलक्या काढू लागलो. मला प्रवासात तरी एका जागी सलग बसता येत नाही. पाय फुरफुरू लागताअअत. मी खूप प्रयत्न केले, चित्रपट बघितले, झोपलो, वाचायचा प्रयत्न केला पण पायाच फुरफुरणं इतकं तीव्र होत की शेवटी मुकाट दर तासाने पाय मोकळे करून यायचो. बाहेर खूप छान दिसत होतं.. माझा डिजीटल कॅमेरा आणला नाही ह्याचं मला दु:ख झालं. पण माझा नाईलाज होता.. माझ्या विसरभोळेपणाचा इतका धसका सगळ्यांनी घेतला होता की मला रोल घातलेला जुना कॅमेरा न्यावा लागला. इतका मागासलेला प्रवासी कुठल्याही विमानात नसावा.. बरं तो कॅमेरा वरच्या बॅगेतही ठेवू नाही दिला (आणि दिला असता तरी विमानात तो काढण्याची माझी हिंमत झाली नसती). थोड्यावेळाने हा प्रवास कधी संपेल अशी माझी अवस्था झाली.. दरम्यान जेवण झाले, नंतर वाइन झाली.. दुपारची (ही युरोपमधील दुपार) बीर घेऊन झाली आता मात्र कंटाळा येऊ लागला. एवढ्यात आम्ही अर्ध्या तासात हीथ्रो विमानतळावर उतरू अशी घोषणा झाली. सगळा कंटाळा विसरून मी नव्या उत्साहाने उठलो.. ताजा झालो, दात घासले, चेहरा धुतला इ. इ. केले, आणि काचेतून बाहेर बघतो तो काय? संध्याकाळच्या उतरणीच्या उन्हात छोटे छोटे काळे डांबरी रस्ते आणि त्यांच्या दोन्ही बाजूला टुमदार लाल छपरांची घरं.. पाहताक्षणी मला ते दृश्य आवडलं आणि मी उत्सुकतेने इकडे तिकडे पाहू लागलो. थोडं दूरवर खुद्द लंडन शहर दिसत होतं.. आमचं विमान हळूहळू उतरायची तयारी करत होतं.. मी सुद्धा लगेच माझं सीट्वरील गबाळं आवरलं आणि विमान उतरायची वाट बघू लागलो. विमानतळावर ३-४ घिरट्या मरून अखेर आमचे विमान मिळालेल्या धावपट्टीच्या रोखाने निघाले…. चाक जमिनीला टेकल्याच जाणवलं… विमान पुढे जातच होत… हळूहळू वळून ते थांबलं आणि उतरणाऱ्याची एकच झुंबड उडाली.