लेबले (टॅग्ज)

, ,

हीथ्रो विमानतळावर मी उतरलो आणि गर्दीबरोबर वाहता-वाहता सामान गोळा करण्याच्या पट्ट्याजवळ आलो. सगळेजण कमालीच्या शांतपणे उभे होते. जर मी त्यांना पट्ट्यावरून वाहत आलेले सामान उचलताना बघितलं नसतं, तर हे इथे काय करायला आलेत असा प्रश्न मला नक्कीच पडला असता.मी आपला बावळटासारखा त्यांच्याकडे बघत होतो. हळूहळू सामान उचलणारे लोक कमी व्हायला लागले तसा मी काळजीत पडू लागलो. नंतर तर फक्त रिकामा पट्टा फिरू लागला…माझा धीर सुटायला आला होता..माझी मोठी बॅग अजून आली नव्हती….शेवटी बोंब मारायच्या आधी इथे तिथे बघू म्हणून पट्ट्याला चक्कर मारली आणि आमची निळी बॅग तिथे पट्ट्यावर लवंडली होती. एक मोठ्ठा नि:श्वास टाकून मी ती बॅग उचलली आणि इमिग्रेशनच्या दिशेने चालू लागलो. इमिग्रेशन काउंटर वर सुदैवाने फार गर्दी नव्हती. लोक पटापट पुढे सरकत होते. मी त्या काउंटरवरील लोकांपैकी एक सुंदरी अथवा एक मायाळू दिसणारा इंग्रज ह्यांच्यापैकी एकाकडे माझा “लंबर” जावा शी इच्छा मनी बाळगून उभे होतो. अचानक माझ्यापुढचा माणूस डावीकडे वळून पुढे गेला…आणि आपण एका उग्र दिसणार्‍या काळूरामाकडे जाणार ह्याबाबत माझी खात्री पटली. मी त्याच्याकडे बघितले आणि त्याने मला हातानेच पुढे बोलावले. मी त्याच्यासमोर जाऊन प्रेमळ आणि स्नेहल असे “हाश्य” केले ज्याचा त्याच्यावर काहीही परिणाम नाही झाला. बहुधा माझ्या चेहेर्‍यावर अवघडलेपण, भीती आदी भाव घाऊक रूपात दाटले होते. तो माझी विचारपूस करणार एव्हढ्यात मागून एक बर्वे, चितळे इ.इ. मध्ये खपेल असा, गोरा, घार्‍या डोळ्यांचा, आणि ५ फूट उंचीचा एक कर्मचारी आला, आणि माझ्यासमोरील रेड्याला,”आज माझ्यासाठी कोणी ठेवू नकोस”. असं म्हणाला. इथले सर्कारी लोकही आपल्यासारखेच, असं वाटून मी कान टवकारले. त्यांच्या संभाषणाचा सारांश असा: आज ईस्लामाबादेहून येणार्‍या विमानप्रवाशांची तपासणी करायला बर्वे (आय मीन तो गोरा) होता. त्याने सगळ्यांना तपासून सोडून दिले. नंतर पोलिसांनी त्यातल्याच एकाला पकडले आणि हलगर्जीपणाबद्दल साहेबांनी त्याला बांबू दिला होता आणि पदावनतीपण केली होती.”तो ईस्लामाबादेतून कसा सुटला ते विचारा ना!!” असे बडबडत तो साह्यबाच्या नावाने खडे फोडत होता. त्याने अत्यंत कोरडेपणाने माझा पासपोर्ट बघितला. सगळं व्यवस्थित असल्याचे खात्री केली आणि मला म्हणाला चेस्ट एक्स-रे द्या. माझ्या पोटात बर्फाची लादी बसली!! हे असं काही न्यावं लागेल हे मला ऑफिसमधले प्रवास विभागतील लोक बोलले नव्हते. माझा दिवाळं निघाल्यागत चेहरा बघून तो मला म्हणाला,”तिथे डावीकडे मेडीकल ऑफिसर आहे, तिथून एक्स-रे काढून आणा”. शेवटी एकदाच ते प्रकरण संपले आणि मी विमानतळाबाहेर आलो.

बाहेर आल्यावर मी नकाशा वगैरे पाहायला सुरुवात केली. त्यांचे नकाशे बनवून तपशील देण्याची पद्धत मला फार आवडते. मला लंडनजवळील सीवर्डस्टोन ह्या वाल्थम अ‍ॅबे ह्या गावाजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जायचं होतं. मी नकाशा बघून अंदाज घेतला आणि कटकट नको म्हणून सरळ टॅक्सी करायचे ठरवले. जवळ बघितलं तर काळ्या टुमदार टॅक्सीज दिसत होत्या. त्यात ज्याचा नंबर होता त्याच्याकडे गेलो तर चक्क आजोबा होते ते. त्यांना पत्ता दिल्यावरच त्यांनी सांगितले हे लांब आहे त्यामुळे भाडे जास्त होईल. मी विचारले किटीपर्यंत जाईल? त्यांनी त्यांच्या मीटरकार्ड वाचून सांगितले १४० पौंड. वास्तविक तेव्हा माझी ट्यूब पेटायला हवी होती की हे भाडं जास्त आहे, आणि म्हणजेच बहुधा ठिकाण लांब असेल. पण त्यावेळी प्रवासाचा शीण म्हणा, किंवा साध्या टॅक्स्या जवळ नसल्यामुळे म्हणा, मी त्यांना चला म्हटले. आजोबांच्या चेहेर्‍यावर पूर्ण अविश्वास होता..नंतर त्यांच्याशी बोलताना कळलं, की येव्हढ महाग भाडं घेऊन लोक सहसा जात नाहीत. हे ऐकून माझ्या पोटात कळ आली..म्हटलं आता हे टॅक्सीच बिल ऑफिसने नाही संमत केले तर गेले पैशे खिशातून. बराच वेळ मी चिंताक्रांत बसलो होतो, शेवटी मी मलाच समजावले,”बाबारे, त्याला अजून वेळ आहे. तू आतापासून उदास होऊ नकोस”. तोपर्यंत आम्ही लंडनमधून बाहेर पडलो होतो आणि “ब्रिटिश कंट्रीसाईड” दिसू लागली होती. अंधार पडत असतानासुद्धा दिसणार्‍या त्या दृश्याने मी खूश झालो. अचानक भानावर येऊन मी जमेल तसे फोटो काढू लागलो. मध्येच मला ड्रायव्हर आजोबा कुतूहलाने माझ्या कॅमेर्‍याकडे बघतायत हे ही लक्षात आलं

मी मुकाटपणे जमेल तसे फोटो काढत होतो. पहीलटकर असल्याने मला सगळ्याचंच अप्रूप वाटत होतं. नंतर एक गाव आलं छोटंसं..टुमदार देखणी घर, आखीव रेखीव रस्ते, खूपच छान..पण आमच्या गावचा पत्ता नव्हता. आमच्या ड्रायव्हरआजोबांना मी सुचवले आपण कुठेतरी थांबून चौकशी करू..पण ते फक्त नकाशा दाखवून मला गप्प करत होते. गावावरून थोडं पुढे गेल्यावर त्यांनी गाडी थांबवली नकाशाचा अभ्यास केला आणि गाडी परत वळवली. आम्ही ज्या गावातून गेलो त्याच गावात परत येऊन मूळ रस्त्याला लागलो. आम्ही -३-४ फेर्‍या मारल्या, मी दरवेळी मुकाटपणे फोटो काढत होतो. ३-४ फोटो मी काढले नंतर मी अस्वस्थ झालो आणि आजोबांना सुचवलं आपण कोणाला तरी विचारू या. अखेरीस त्यांना पटले आणि एका स्थानिक बार जवळ त्यांनी एका माणसाला विचारले. त्याने अजून ४ जणांना विचारले, आणि अखेर एक मध्यमवयीन बाई आमच्याकडे स्मितहास्य करत आपल्या गाडीत बसल्या आणि आम्हाला मागे या असे हातवारे केले. आणि आमची गाडी त्यांच्या मागे जाऊ लागली. वाटेत अजून २ फोटो मी काढले. एक साधारणतः २० मिनिटात आम्ही इच्छीत स्थळी पोचलो. त्या बाईचे आभार मानले आणि मी हॉटेलमध्ये चेक-इन केले.