सूचना:- हे मी आत्तापर्यंत वाचलेले ऐकलेले इ.इ. आठवून लिहितोय. मला आधी माहीत असतं की मी अण्णांचा पंखा होणार आहे तर सगळ्या नोंदी एकत्र ठेऊन दिल्या असत्या, पण तसं नाही. त्यामुळे चु.भु.दे.घे

माणसाच्या मनाचं काही खरं नसत. ओढ एका गोष्टीची असते पण भलत्या गोष्टीला भुलून तीच्याच नादाला लागतो आणि स्वत:चे गुण वाया घालवत बसतो.
१९३२-३३ चा काळ असेल. मिनर्व्हा मुव्हीटोनचा स्टुडीओ. त्या स्टुडीओतील एक दृष्य. एक्स्ट्रॊ कलाकारांची वर्दळ चालू होती. बाकी सगळे लगबगीने आपापली कामं करत होते, तिथेच राम एका सह-एक्स्ट्रॊबरोबर बोलत ऊभा होता. अभिनयाचं वेड घेऊन तो मुंबईत आला होता आणि एक्स्ट्रॊ म्हणून स्थिरावला होता. नशीब ह्याला पळवत होतं, लहानपणी घरच्यांच्या ईच्छेविरूद्ध गाणं शिकायला म्हणून घरातून पळाला, नागपूरला सप्रेबुवांकडे तालीम घेतली आणि नंतर एका नाटक कंपनीने उचलला, हळूहळू सिनेमात गेला…पहिला चित्रपट नायक म्हणून मिळाला, पण तो दणक्यात पडला आणि मग थेट एक्स्ट्रॊ म्हणूनच काम मिळू लागली. दिवस बरे होते पण यश मिळत नव्हत. अजून किती दिवस हे असं काम करायचं आणि आशेवर जगायचं कुणास ठाऊक. त्यांच बोलण चालू असतानाच, एक्स्ट्रॊ पुरवणारा बाहेर आला आणि त्याने तडक वाईट बातमी दिली,”धंदा मंदीत असल्यामुळे स्टुडिओ एक्स्ट्रॊ आणि अन्य कंत्राटी कामगार कमी करणार आहे, त्यामुळे आता इथे काही काम मिळणं कठीण आहे”. हे ऐकून लोकांची चलबिचल सुरू झाली, गलका व्हायला लागला, काही कंत्राटदाराशी बोलून कुठे काय जमू शकते का ते बघु लागले. राम सुन्न होऊन हे सगळ बघत होता…त्याला ब्रह्मांड आठवले. नट होणं सोडाच, पण एक्स्ट्रॊ होणं पण धड होत नव्हत…हे असं का व्हावं त्याला कळत नव्हत. पण त्याला कल्पना नव्हती कि नियती त्याच्याकडे बघून गालात हसत्येय, आणि लवकरच आपण योग्य रस्त्याला लागणार आहोत.
आपली नोकरी जाणं परवडणारे नाही हे राम चांगलंच जाणून होता, पण काय करावे हे त्याला कळेना, त्याने २-३ लोकांना विचारून पाहिले आणि तिथेही डाळ शिजत नाही हे पाहून त्याने थेट सोहराब मोदींना भेटायचं ठरवलं. त्यावेळी मोदी साहेबांचा दरारा काही औरच होता. आधीच त्यांच रुबाबदार खान्दानी व्यक्तीमत्व, जबर्दस्त आवाज, आणि कडक शिस्त ह्यामुळे लोक त्यांना दबकून असायचे. त्यात स्टुडीओचे मालक म्हणजे अजूनच कठीण काम, पण मेलं कोंबड आगीला भीत नाही ह्या न्यायाने, राम अगदी निकाराचा उपाय म्हणून त्यांना भेटला. अपेक्षेनुसा मोदींनी रामच ऐकून घेतलं आणि मग त्याला आपल्या भारदस्त आवाजात म्हटलं,”अरे पण स्टुडीओच्या अवस्थेत मी फक्त तेच लोक ठेऊ शकतो जे सतत कामात असतील, आणि एक्स्ट्रॊ सतत लागत नाहीत हे तुला ठाऊक आहे”. राम म्हणाला, “साहेब, सध्या नोकरी सुटणं मला परवडणारं नाही. मी पडेल ते काम कराय्ला तयार आहे.” मोदी साहेब म्हणाले, “आपल्याला हार्मोनियम वादक हवाय, जमेल का?” राम लगेच उद्गारला, “साहेब सहज जमेल, मी संगीत शिकलोय. मला एक संधी द्या.” मोदींनी रामकडे रोखून पाहिले आणि लगेच संगीतकार मीरसाहेब ह्यांना भेटायची आद्न्या दिली. त्या क्षणी त्यांना आणि रामला सुद्धा कल्पना नव्हती की एका युगाची नांदी झाल्येय.
संगीत विभागात रामच काम जोमाने चालू झाले. मीर साहेब तर भलतेच खुष झाले. एक तर त्यांना किंवा त्यांच्या सहाय्यकांना गाता येत नसे त्यामुळे गायकाला चाल समजावत असताना वांदे होत, त्यात स्वरलिपी पण अवगत नव्हती त्यामुळे सुचलेली चाल लिहिता येत नसे आणि कहर म्हंजे मीरसाहेब विसरभोळे होते….त्यामुळे अनेकदा रेकॊर्डिंगच्या आधी तालमीतच ते चाल विसरायचे. असल्या गदारोळात राम आला आणि त्यांना देव (पक्षी:अल्ला/खुदा) भेटल्याचा आनंद झाला. राम पेटीवर सराईत होता, चांगला गाणारा होता, आणि चाल ऐकल्यावर पटापट स्वरलिपी लिहायचा, त्यामुळे लौकरच तो त्यांचा खास माणूस झाला. मीरसाहेबांबरोबर अजुन एक माणूस रामवर खुष झाला तो म्हणजे दिग्दर्शक मास्टर भगवान. भगवान त्या काळात गल्लाभरू चित्र देणारा यशस्वी दिग्दर्शक. बाबुराव-भगवान, मा.विठ्ठल-भगवान ह्या मारामारी-पटातील तत्कालीन लोकप्रिय जोड्या होत. भगवान अनेकदा मीरसाहेबांमुळे खोळंबत असे. असच एकदा मद्रासला काम अडकलं आणि मीरसाहेबांनी भगवानला राम चितळकरला बोलावून घेऊ तो पटकन सगळी कामं उडवेल असं सांगितल. राम मद्रासला गेला, आणि पटापट स्वरलिपी-लिखाण करून गाडी रूळावर आणली. भगवानला एक कामाचा माणूस भेटल्याचा आनंद झाला आणि रामला सुद्धा भगवानचा कामाचा झपाटा आवडला आणि त्यांची मैत्री जमली. हळूहळू मीरसाहेबांसाठी राम चाली पण रचू लागला. लाल हवेली बोलपटासाठी त्याने चक्क नूरजहान आणि सुरेंद्र ह्यांच्यासाठी एक द्वंद्वगीत रचल आणि गाऊनही घेतलं
एक दिवस अचानक, भगवान ने रामला सांगितलं, “मला एक तामिळ चित्रं मिळालंय आणि त्याचं संगीत तु करायचंस” अशा प्रकारे रामला वनमोहीनी (१९४१) हा पहीला बोलपट मिळाला, त्यानंतर त्याने अजून एक तमिळ चित्रपट केला. पण पुण्या-मुंबईत संधी मिळत नव्हती. अचानक भगवाननेच त्याचे द्वारका खोसला ह्या निर्मात्याबरोबर गाठ घालून दिली आणि सुखी जीवन(१९४२) हा बोलपट मिळाला. त्याच वेळी खोसलांनी त्याची गाठ जयंत देसाईशी घालून दिली आणि राम सम्राट चंद्रगुप्तचाही संगीतकार बनला. ह्याच वेळी निर्माता जयंत देसाईने, अण्णासाहेब, राम चितळकर ही नावं शोभत नाहीत म्हणून रामला एक नाव दिलं सी.रामचंद्र…अशा रीतीने १९४३ साली सी. रामचंद्र हे नाव संगीतकार म्हणून जगासमोर आलं नायक बनण्याच्या नादात आपली प्रतिभा वाया घालवणार्या राम चितळकरला, त्याच्या नियतीने कानाला धरून नशीबाच्या दाराशी आणून ठेवलं