सी.रामचंद्रनी जयंत देसाईबरोबर, भक्तराज, जबान (दोन्ही १९४३), ललकार, मनोरमा(दोन्ही १९४४) आणि सम्राट चंद्रगुप्त(१९४५) हे बोलपट केले. हे सर्व चित्रपट व त्यांचं संगीत गाजलं. जयंत देसाई निर्माता असल्यामुळे सगळीकडेच लक्ष देत आणि मत सुद्धा देत. एकदा एक दु:खी गाण्याच्या रेकॉर्डिंगला ते आले आणि योग्य परिणाम येण्यासाठी कोरस वापरा असं सांगून गेले. सी.रामचंद्र १ आठवड्याने त्यांना रेकॉर्डिंगला घेऊन आले आणि तेच गाणं ऐकवलं….वर म्हणाले,”तुम्ही म्हटल्यानुसार मी कोरस काढला आणि काय सुंदर वाटतंय आता गाणं!!!”. देसाई खुष!!! सी.रामचंद्रपण खुष!!
१९४४ साली सी.रामचंद्र दिल की बात ह्या बोलपटाला संगीत देत असताना, त्यांची भेट प्रसिद्ध कवी श्री.प्रदीप ह्यांच्याशी झाली आणि प्रदीप ह्यांनी सी.रामचंद्र ह्यांना फिल्मीस्तानचे सर्वेसर्वा श्री शशधर मुखर्जी ह्यांच्याशी भेटवलं. हा प्रसंग सी.रामचंद्र ह्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला आणि संगीतकार म्हणून राजमान्यतेची मोहोर त्यांच्या नावावर उमटली असं समजायला हरकत नाही कारण फिल्मीस्तान हे नावच तितक मोठं होतं. अनेक संगीतकार पदरी असलेलं, अनेक कलाकार तंत्रज्ञ पदरी असलेला हा एक मोठा स्टुडीओ होता. तो काळ म्हणजे संगीताच्या सुवर्णयुगाची नांदी होती. मास्टर गुलाम हैदर, रायचंद बोराल, तिमिर बरन, पंकज मल्लिक, के.सी.डे, मास्तर कृष्णराव, केशवराव भोळे,अनिल विश्वास, खेमचंद प्रकाश ह्या संगीतकारांनी वेगवेगळे संस्कार्/प्रयोग करून चित्रपटसंगीतात एकेक प्रवाह आणले होते, आणि हळूहळू नवीन शिलेदार पुढे येत होते. एकेकाळी सी.रामचंद्रबरोबर रेकॉर्डिंग स्टुडीओ मधे उमेदवारी करणारा नौशाद अली एक मोठा संगीतकार म्हणून नावारूपाला आला होता. खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास हे प्रस्थापित होते. सैगल-नूरजहान युग ऐन भरात होतं.
१९४६ साली फिल्मीस्तानचा सफर बोलपट सी.रामचंद्रनी केला आणि त्यातील गाणी तूफान गाजली. पुढच्याच वर्षी (१९४७) साजन आणि शेहेनाई हे दोन बोलपट संगीतामुळे तूफान गाजले. साजनचा नायक अशोककुमार होता. तो त्याची गाणी गायचा, आणि अण्णांना तर त्याला टाळायच होतं आणि रफीकडून गाऊन घ्यायचं होतं…सुपीक डोक्यातून अजून एक कल्पना आली….जेव्हां जेव्हां अशोककुमार कामात असेल तेंव्हाच रेकॉर्डिंग ठेवायचं…असं होत होत होत, अशोककुमारच्या लक्षात आलं की वेळं मिळनं कठीण आहे, तेंव्हा त्याने “किसी और से गवां लो” असं सांगीतल आणि रफीने ते गाणं म्हटल आणि उरलेली सुद्धा त्यानेच म्हटली. साजन मधली तुम हमारे हो न हो आणि सुनो बाबु गलीमें तेरी चांद चमका ही गाणी गाजली. शेहेनाई हा चित्रपट तर ऐतिहासीकच म्हणायला हवा कारण इथेच लताबाई आणि सी.रामचंद्र ह्यांनी प्रथम एकत्र काम केलं. मुखर्जींचा विरोध पत्करून लताबाईंना जवानी की रेल चली जाय रे ह्या गाण्यात संधी दिली. त्यानंतर गुरू अनिल विश्वासचा राग पत्करून आना मेरी जान मेरी जान संडे के संडे हे धमाल गाणं दिल. अनिल विश्वास एकदा ह्या गाण्याची आठवण सांगताना एकदम म्हणाले होते,”राम सारखा प्रतिभवान संगीतकार मला गुरू का मानतो हे कोडंच आहे, त्याने काही मला असिस्ट केलं नाही का शिकला ही नाही माझ्याकडून काही, पण माझ मेलडी स्कूल मात्र त्याने हर्क्युलसने पृथ्वी पेलावी तसं पेलून धरल”.
शहनाईचं संगीत तूफान गाजलं. मुखर्जी मेरी जान मेरी जान ऐकून भडकले आणि हे थिल्लर गाण काढा असं म्हणाले…ते गाणं कसंबसं राहील आणि त्यानेच ईतिहास घडवला. अर्थात नंतर पाश्चात्य संगीतातून चोरी मारी सी.रामचंद्रनेच सुरू केली असा आरोपही केला गेला, पण शेहेनाईमधीलच मार कटारे मर जाना आणि हमारे अंगना बाजे शेहेनाई ह्या अस्सल भारतीय गाण्यांचा विचार कोणीही केला नाही. मुखर्जीसुद्धा संडे के संडे गाजल्यावर थंड झाले असावेत. एव्हांना अण्णांचे गायक म्हणून रफी, अमीरबाई आणि शमशाद बेगम ही नाव पक्की होऊ लागली होती.
१९४८ साली आलेल्या खिडकी आणि नदीया के पार ह्या दोन बोलपटांनी कहर केला. खिडकी मधील किस्मत हमारे साथ है, जलने वाले जला करे ने कहर केला, तर नदिया के पार मधील मोरे राजा हो ले चल नदिया के पार हे रफी आणि ललीता देऊळगांव्कर ह्यांनी गायलेल गाणं गाजत होतं. ह्या काळात लताबाईंना किरकोळ गाणी दिली सी.रामचंद्रनी. बहुधा एक संगीतकार म्हणून त्यांचा विश्वास लता मंगेशकर ह्या गायिकेवर अजून बसला नव्हता.
पण १९४९ साल आलं आणि सगळ चित्र बदलून गेलं. लता मंगेशकर ह्या नावाच्या श्रेष्टत्वावर शिक्कामोर्तब ह्याच सालात झालं आणि त्यांनी गाईलेले एकाहून एक सरस बोलपट ह्याच वर्षी आले. ह्या साली एक थी लडकी, बरसात, अंदाज, महल, तराना हे चित्रपट आले. सी.रामचंद्रनी लताबाईंना ह्या एकाच वर्षात नमूना, पतंगा आणि सिपाहिया हे तीन बोलपट दिले. तसंच १९४९ मध्येच त्यांनी सुरैयाबरोबर दुनिया ह्या बोलपटात काम केलं तर राजकुमारीबरोबर जिगर मध्ये कामनमूना, पण लताबाईंबरोबर केलेलं काम अजरामर झाल. नमुना मधलं एक ठेस लगी आंसू टपके, अथवा पतंगामधील दिलसे भूला दो तुम हम,, कधी खामोश हो जाना अथवा ओ जानेवाले तुने अरमानोंकी दुनिया लूट ली असो की सिपाहियामधील लगा है कुछ ऐसा निशन किसीका वा ऐ आंख अब ना रोना असो, ही सगळी गाणी तूफान गाजली.
पुढची काही वर्षं सी.रामचंद्र आणि लताबाईंनी इतकी कहर गाणी दिली की सामान्य जन मोहून गेलेच पण अनेक संगीतकारांनी सुद्धा, लताबाईंसाठी गाणी देणं ही अण्णांची स्पेशालीटी आहे हे कबूल केलं, आणि लताबाईंनी सुद्धा ती गाणी तितकाच स्पेशल टच देऊन गायली. एका मुलाखतीत (बहुदा रेडिफ.कॉम वर मी वाचल हे) श्री. सलिल चौधरी मधुमती मधे असलेल्या आजा रे परदेसी ह्या गाण्याबद्दल बोलत होते. ते म्हणाले,”हे गाणं गाजू लागल्यावर मला फोन आला…कॅन यु इमॅजिन?? अण्णा रामचंद्र…ते म्हणाले सलिल काय छान उपयोग केलायस तु लताच्या आवाजाचा…अगदी १६ वर्षाची मुलगी गात्येय असं वाटतय!! खुद्द अण्णांनी असं म्हटल ही त्या गाण्यासाठी सर्वात मोठी पावती होती.”
१९४९ साल संपेपर्यंत अण्णा एक प्रमुख संगीतकार म्हणून गाजू लागले होते. त्यांचा अनेकांशी स्नेहही झाला होता. लताबाई, नौशाद, एस.डी.बर्मन, हेमंतकुमार, रोशन, अनिल विश्वास, भगवान, ओमप्रकाश, राजेंद्र कृष्ण, प्यारेलाल संतोषी इ.इ. त्यांचे मित्र होते. हिंदी बोलपटातील संगीताच्या सुवर्ण-युगाची सुरूवात अशा पद्धतीने दणक्यात झाली…आणि त्यातील एक बिनीचे शिलेदार होते सी.रामचंद्र.
सी. रामचंद्र – भाग २
18 रविवार Sep 2011
Posted in संगीत