तर ठरवल्याप्रमाणे अस्मादीक आमच्या सहकार्यांसोबत अमाप उत्साहाने सळसळत टेस्कोकडे निघालो. सर्वप्रथम प्रथेनुसार कसं जाव ह्यावर चर्चा झडली आणि रू., पै, आणे….चुकलो, पौंड आणि सेंट(च ना? नाही नाही पेन्स) ह्याचा हिशोब करून, शेवटी चालणे आरोग्यास उत्तम असल्याने चालत जावे असे ठरले. टेस्को लांब असेल असा माझा तर्क होता आणि मी फुकट चालत जाण्यास नाखूष होतो. परंतु बहुमतासमोर मी पड खाल्ली आणि चालायला कबूल झालो. जेमतेम २ मिनिटात मी कबूल केल की टॆक्सीने जाण्यात मजा आली नसती. वास्तविक हॊटेलला येतानाच मी तो रस्ता बघीतला होता, पण तो निसर्गसुंदर आहे हे कसा विसरलो कुणास ठाऊक!!! तो चिमुकला रस्ता, दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ आणि झाडी…अहहह…..मन मोहून टाकणारा देखावा होता.

हा रस्ता तसा छोटाच होता, पण वर्दळच कमी. पायी जाणारे तर फक्त आम्हीच होतो. सकाळच्या वेळी एव्हढी शांतता खूप छान वाटत होती. मग एकेक करत गाड्या दिसू लागल्या. अबबबब किती मॊडेल्स…निम्मी तर मी बघीतलही नव्हती. मध्येच हार्ले डेव्हिडसन वर बसून जाणारे म्हातारे दिसले, पण माझा मागसलेला कॆमेरा असल्यामुळे फोटो घेता आले नाहीत आणि काही घेतले त्यातले अनेक आले नाहीत नीट :( !!!…पण जे काही आम्ही बघीतले ते खरंच लक्षात राहिल असे होते. पुलाखालून सटासट जाणार्या गाड्या, तिथेच अस्मादिकांनी केलेले शूटींग :)

पूल ओलांडून पुढे गेलो आणि पाच मिनिटात बैठी घर दिसू लागली आणि आपण गावाजवळ आल्याचं लक्षात आलं गावाचं नाव होतं वाल्थाम ऎबे. इथेच टेस्को होतं…आमच्या आनंदास उधाण आले आणि पटापट पाय उचलत आम्ही गावात शिरलो…स्वागतालाच एक कबरस्थान होतं. ही जागा, सकाळच्या आनंदी वेळी पण उदास छाया टाकणारी वाटत होती, मग तिथे फार न रेंगाळता आंम्ही टेस्को जवळ गेलो….आणि आ वासून पहात राहीलो…..एव्हढं मोठ्ठ दुकान मी तरी आयुष्यात पाहिलं नव्हत. मग लगेच ट्रॊल्या घेऊन आम्ही आत शिरलो….दोन्ही बाजूला हारीने मांडलेली शेल्फ़्स आणि त्यात विविध वस्तू, स्टेशनरी सेक्शन मधे तर मी हरवूनंच गेलो..अखेर मुश्कीलीने पाऊल उचलून आम्ही मोठ्या आशेने खाद्यपदार्थ सेकशन मधे गेलो.

तिथे सुद्धा सर्व वस्तु इतक्या छान मांडल्या होत्या की विकत घ्यायचा मोह व्हावा!!सुरूवातीला, वा! हे आहे का? अरेच्या! हे पण आहे इ.इ. ह होता होता, आम्हाला जाणवलं की ईथे चणे आहेत, पण आपल्याला दात नाहीत….म्हंजे सामान तर सगळ आहे….पण शिजवणार कुठे??? खिन्न होऊन आम्ही इथे तिथे फिरू लागलो..नशीबाने काही रेडी टू ईट मिळाली…पण ती केवळ नाईलाज म्हणून घेतली. आम्ही आता एव्हढे निराश झालो की मरू दे म्हणून आम्ही कॆब केली आणि इन मधे परत आलो.