१९५० हे साल, अप्रतिम आणि कर्णमधुर संगीताने नटलेले बोलपट तर घेउन आलच, पण त्याच बरोबर पुढील अनेक वर्षं कानसेनांना ही मेजवानी मिळत रहाणार आहे हे आश्वासनसुद्धा घेउन आलं. ह्या सालाने, नौशाद आणि रामचंद्र ह्यांच बॉक्स ऑफिसवरचं सार्वभौमत्व सिद्ध केलं, आणि शंकर-जयकिशन, मदन मोहन, रोशन, ओ.पी.नय्यर्,अनिल विश्वास आणि एस.डी.बर्मन हे संगीतकार मिळून अनेक वर्ष तृप्त करणारं संगीत देणार आहेत ह्याची खात्री सुद्धा दिली. ह्या साली अण्णांनी निराला, समाधी, संगीता आणि सरगम हे बोलपट दिले. समाधी आणि सरगम धो धो चालले. दोन्ही बोलपटात अण्णांनी वैशिष्ट्यपूर्ण पाश्चात्त्य आणि भारतीय संगीतावर आधारीत गाणी दिली.
एव्हाना सी.रामचंद्र ह्या संगीतकाराची प्रतिभा इंडस्ट्रीवाल्यांना माहीत झाली. एकाच वर्षी ४-५ बोलपट करून प्रत्येक बोलपटात चांगलं संगीत देणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामूळे सी.रामचंद्र हे नाव सर्वांना माहीत झाले. एव्हांना अण्णांची संगीतशैली सुद्धा विकसीत झाली होती. पाश्चात्य संगीतशैलीत दिलेली अथवा कव्वालीसदृश असलेली खट्याळ गाणी जी दोन, तीन वा प्रसंगी चार गायकांनी कोरस सहीत म्हटलेली. ही गाणी एकंदरीतच धमाल मूड बनवतात आणि धिंगाणा घालायचा आपला मनोदय जाहीर करतात उदा:- खिडकी मधल किस्मत हमारे साथ है जलने वाले जला करे हे कव्वाली शैलीतल गाण, अथवा चिरतरूण राहीलेली संडे के संडे आणि समाधी मधील गोरे गोरे ओ बांके छोरे ही पाश्चात्य धाटणीची गाणी आणि मेळ्यातील गाण्यांच्या शैलीतील ओ दिलवालों दिल का लगाना आणि मेरे पिया गये रंगून ही पतंगामधील गाणी त्याचीच उदाहरणे..आणि ही गाणी सादर करणारे धिंगाणा कलाकार बहुदा गोप, याकुब अथवा भगवानदादा असत. ह्या एकूण संगीतावर पाश्चात्य छाप असे आणि त्या जीवनशैलीबद्दलचे आकर्षण ह्या संगीतात प्रतिबिंबित झाल आहे असं म्हणता येईल.संगीता मधील नाउम्मीद होके भी , समाधीमधील अभी शाम आयेगी निकलेंगे तारे, वो पास आ रहे है, निरालामधील मेहेफिल में जल उठी शमा, ऐसी मुहोब्बत से हम बाज आये, जोर लगालो टूटी गाडी आणि सरगम मधील, जब दिल को सतावे गम, रे ग म ग रे सानी ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी तर मैं हू अलादीन आणि धमाल ,मैं हू एक खलासी मेरा नाम है भीमपलासी ह्या गाण्यांनी लोकाना वेडं केलं होतं. संगीतकार श्री. शंकर ह्यांनी एका मुलाखतीत म्हटल होतं की मेहेफिल में जल उठी शमा हे गाण संगीतकारांना सुद्धा आवडायचं, आणि स्वतः श्री. शंकर ह्यांनी काही गाणी त्या शैलीत बनवली.
यश पाठीशी असल तरी अण्णा आणि भगवान ह्या मित्रांत फरक नव्हता पडला. त्यांच भेटणं, दंगा मस्ती करणं , रेल्वे कँटीनमधे बसून पिणं हे चालूच होत. एकदा भगवान त्याच्या एका बोलपटाचं रश प्रिंट बघत होता आणि मागून आवाज आला, “मजा आ गया दादा!!!”…बघतो तर मागे राज कपूर. तो म्हणाला, “मला जेंव्हा जेंव्हा कळत की तुम्ही रश प्रिंट बघताय, मी पण लपून बघतो…मला खूप कल्पना मिळतात.” हे ऐकून भगवान आश्चर्यचकीत झाला. मग राज कपूर म्हणाला,”दादा कब तक ये ऐसी फिल्में करोगे? ये पीला हाउस छोडो, वर्ना लोग बोलेंगे भगवान राज कपूर को कॉपी करता है!!!”. डोक्यात किडा टाकून कपूर निघून गेला. काही दिवस गेले आणि रेल्वे कँटीनमधे पिणं जोरात चालू असताना राम एकदम म्हणाला,”भगवान यार ऐसा कुछ करते है के साला ईंडस्ट्री के इतिहाससे अपना नाम कोई नही हटा पायेगा….” भगवानला चढलेली खाडकन उतरली…पुढचे काही दिवस राज कपूर आणि रामचे ते शब्द त्याचा पाठलाग करत होते आणि अखेर ह्या अस्वस्थतेतूनच एक अजरामर बोलपट जन्मला अलबेला
१९५१ साल प्रचंड यश घेउन आलं. अलबेला, खजाना, सगाइ, संग्राम, सौदागर, शबिस्तान आणि उस्ताद पेद्रो हे तब्बल सहा बोलपट अण्णांच्या संगीताने नटले होते. अलबेलावर वेगळ लिहायची गरजच नाही…कहर चित्रपट आणि कहर संगीत. गरबा शैलीतले भोली सुरत दिल के खोटे, कॅबरेट स्टाइलचं दिवाना परवाना आणि दोन भिन्न शैलींच मिश्रण केलेलं दिवाना परवाना, अरबी शैलीतल पण रागदारीवर आधारीत मेहेफिल में मेरी कौन ये दिवाना आ गया ही गाणी तूफान गाजली. ह्या धिंगाणा गाण्याबरोबरच, वेस्टर्न शैलीत, गिटार, पियानोचे लाडीक पीसेस टाकत बनवलेलं दिल धडके नजर शरमाए , खास भरतीय शैलीतल लाडिक बलमा बडा नादान आणि कदाचित ह्यांचा कळंस धीरे से आजा रे अखियन में ही तरल आणि आईच्या मायेने व बाळाला मांडीवर झोपवताना जो ताल येतो त्या तालाने भारलेली ही अंगाई. खुद्द अण्णा म्हणाले होते की ही रचना करताना मी मुल मांडीवर घेउन कसं झोपवतात ह्याचा विचार करून त्याच लयीत ही अंगाई बांधली. खजाना मध्ये खास अण्णा-लता टीमची रचना ऐ चांद प्यार तेरा ही अनेकांना मोहवून गेली. तर सगाई मधील लता तलतचं मुहोब्बत में ऐसे जमाने भी आए हे त्यांच्या सर्वोत्तम द्वंद्वगीतात जाऊन बसल. संग्राममध्ये अरूणकुमारने गायलेल वो उनका मुस्कुराना आणि लता-चितळकर ह्यांनी गायलेले उल्फत के जादू का दिलपे असर है हि गाणी भरपूर गाजली.
शबिस्तानमध्ये विभुती मित्रा संगीतात ना़क खुपसायला लागला म्हणून तो बोलपट अण्णांनी सोडला, पण त्यांचा असिस्टंट आणि मित्र मदन मोहन संगीतकार म्हणून आल्यावर अण्णांनी मदत केली आणि संगीतकार म्हणूनसुद्धा मदनचच नाव दिल. असं म्हणतात की मदन मोहनच्य पिताश्रींनीच सी.रामचंद्रना मदनला असिस्टंट म्हणून घ्यायची विनंती केली आणि फिल्मीस्तानचं कारकिर्दीत भरीव योगदान आहे आणि वैयक्तीक संबंध म्हणून अण्णांनी स्वतःच नाव लावलं नाही. श्री मदन मोहन ह्यांच्या वेबसाईट्वर मात्र अण्णांच्या ह्या बाबींची माहीती नाही…किंबहुना मदन मोहन आणि अण्णा ह्यांचे वैयक्तीक नातं फार चांगल होत ह्याचा कुठलाही उल्लेख नाही, ही नोंद करू इच्छीतो.
एकंदरीतच सी.रामचंद्रमहीमा वाढीस लागला होता. चितळकर ह्या नावाने गायलेली गाणीही गाजू लागली. लताबरोबरचं कॉम्बीनेशन तर डेडली होतं. संगीतकार-गायक ह्यांच्यात द्वैत नसलं की काय होउ शकत ह्याचं सर्वोत्तम उदाहरण. हीच अनुभुती पुढे लता-मदन आणि आशा-नय्यर जोडीने दिली.