रोशन-मुकेश

हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि अनेक संगीतकारांनी आपल्या संगीतरचनेच्या प्रतिभेने लोकांसाठी कर्णमधुर संगीताचा खजिना खुला केला. अनेक प्रतिभावान गायक गायिकांनी आपल्या प्रतिभेने ते स्वर आपल्यापर्यंत पोहोचवले आणि आपले कान तॄप्त केले. ह्या गायक-गायिकात लताने ध्रुवाचे अढळपद मिळवले तर आशा-रफीने चंद्राचे-सूर्याचे स्थान मिळवले. तर मुकेश-तलत-मन्ना-हेमंत-किशोर-शमशाद-गीता हे ह्या स्वरगंगेतील सप्तर्षीच!!
अनेक संगीतकारांचा आणि ह्या गायकांचा उदय एकाच सुमारासचा असल्यामुळे त्यांच्या काही मस्त जोड्या जमल्या. रोशन-मुकेश ही त्यापैकीच एक. १९४९ हे साल हिंदी चित्रपटसंगीतासाठी चांगलच महत्त्वाचं ठरलं. लता मंगेशकरच्या असामान्यत्त्वावर शिक्कामोर्तब, तलतची एंट्री, मुकेश-रफीचं मुख्य प्रवाहात येणं, नौशाद, सी.रामचंद्र ह्यांच्या टॉप-रँकवर शिक्कामोर्तब ह्याचबरोबर, शंकर-जयकिशन, रोशन आणि ओ.पीं.नय्यर ह्यांच अनुक्रमे बरसात, नेकी और बदी आणि कनीज(पार्श्वसंगीत)आगमनही ह्याच वर्षी झालं. हा काळ लता, मुकेश आणि तलतचा होता.ह्या काळात मुकेशचा खर्ज एव्हढा गोड लगायचा अगदी विचारू नका. ह्याच काळात त्याने आणि रोशनने काही अवीट गोडीची गाणी दिली त्यावर ही एक नजर.
१९४९ किदार शर्मांचा नेकी और बदी पडला पण तरीही किदार शर्मांनी पुढचा चित्रपट मोठ्या विश्वासाने रोशनना दिला आणि त्यातील गाण्यांनी रोशनंच नाव प्रसिद्ध झालं. चित्रपट होता बाँवरें नैन. ह्यातील मुकेश, गीता रॉय आणि राजकुमारीने म्हटलेली गाणी तूफान गाजली. बाँवरे नैन म्हटल्यावर दोन गाणी सगळयात आधी आठवतात, राजकुमारीने लाडात म्हटलेलं,”सुन बैरी बलम सच बोल रे” आणि मुकेश-गीताचं “खयालो में किसीके इस तरह आया नही करते”. हे गाणं जरी ऐकलत तरी मुकेशच्या आवाजाच्या गोडव्याची जाणीव होईल.किदार शर्मांचे अर्थपूर्ण शब्द आणि त्यांना कसरत न करता लावलेली चाल्.उदा:-खयालो में किसीके इस तरह आया नही करते ह्या ओळीत शब्द चालीत बसवताना गीताला एक गोड आलाप दिलाय, तर मुकेशच्या दिलो को रौंद कर ह्या ओळीत जो ठुकराये गये हो उन को हा भाग तसाच आलापाने लांबवून, उन वर तोडलाय. सगळ गाणं एकेका ओळीच्या भागाला नीट चाल लावून बांधलय, त्यामुळे शब्द तुटल्यागत वाटत नाहीत. हीच वैशिष्टय घेऊन “मुझे सच बता दो..क्या?” है प्रश्नोत्तर स्टाईलचं गाणं आणि सगळी आर्तता ओतून लिहीलेलं,चाल लावलेलं आणि गायलेलं “तेरी दुनिया में दिल लगता नाही”. ह्यातील शब्द घायाळ करण्याची ताकद असलेले आहेत्.”बहार आयी थी किस्मतने मगर ये गुल खिलाया, जलाया आशियां सैय्यादने पर नोंच डाले, मुझको ऐ मालिक उठा ले”. ह्या गाण्यातील वादयवॄंदसुद्धा, पुर्वसुरींकडून चार गोष्टी घेऊन आपला स्वतंत्र बाज असलेलं आहे.
१९५० साजरं केल्यावर १९५१ मध्ये रोशन-मुकेश जोडीने हमलोग आणि मल्हार ह्या दोन चित्रपटातून सुमधूर गाण्यांचा वर्षाव केला.चला तर एकेक गाणं ऐकूया. हमलोगमधलं पहिलं गाणं छान जलद गतीतलं प्रेमी मनाची अवस्था सांगणारं गाणं“अपनी नजरसे उनकी नजर तक” हे गाणं. इथे रोशनचा स्वतंत्र बाज अगदी स्पष्टं जाणवतो. दुसरं गाणं लोभस चाल, सुंदर वाद्यवॄंद मेळ आणि अर्थातच मुकेशचा आवाज ह्याने अगदी ऐकावसं वाटेल असं झालय.चायनिज ब्लॉक्ससारखं नाजूक तालवाद्य, सोबत गिटारीचा तुकडे, आणि बासरी….अफलातून वातावरण निर्मीती करणारं गाणं आहे.दिलकी परेशानिया…दर्द भरी दास्तां. मल्हारमधील अत्यंत लोकप्रिय आणि अलीकडे नॉन्-स्टॉप गरब्यामध्ये लोकप्रिय झालेल बडे अरमानसे रख्खा है बलम हे लता-मुकेशचं गीत.अ‍ॅकोर्डियन, व्हायोलिन्स आणो बासरीच्या आनंदी सुरावटीवर सुरू होणारं हे आनंदी गाणं. ह्यातील रोशन स्टाईल, अनहोनीच्या गाण्यांमध्ये पण जाणवते.दिल तुझे दिया था रखने को तुने दिल को जलाके रख दियाव्हायोलिन्स आणि बासरीच्या संगतीने हे संथ, दु:खी गाणं मनात रेंगाळत रहातं. ह्या काळातलं रोशनचं वैशिष्ठ्य म्हणजे मुखडा-अंतरामध्ये जे संगीताचे तुकडे आहेत ते अगदी साधे आणि छोटे आहेत.१९५०-५१ च्या शैलीत संपूर्णपणे मिसळून गेलेलं तारा टूटे दुनिया देखे.सुरूवात एका शेराने आहे. त्याची चाल सुरेख आहेच, पण मुकेशने ते गजल्-शैलीत गायलंयही छान. शेर म्हणत असताना मागे पियानोचे नाजुक तुकडे ऐकू येतात आणि शेर संपल्यावर मट्क्याचा ठेका, मेंडोलिन आणि व्हायोलिन्सने गाण सुरू होतं.मल्हारमधलं लता-मुकेशचं अजून एक गीत म्हणजे
केवळ अद्वितीय असे कहां हो तुम जरा आवाज दो हमें तुम याद करतें हैं पियानो, व्हायोलिन्स आणि मटका ठेका…..सुरूवातच असली सुंदर आहे…गाण्यातला सगळा दु:खी भाव वाद्यवॄंदात अप्रतिमपणे प्रतिबिंबीत झालाय्…मुकेशने किमया केलीच आहे पण लताबाई!!! ऊफ्फ्फ्फ!!!!
गाण्याच्या शेवटल्या कडव्याचा आलाप तर केवळ अप्रतिम आहे.
१९५२ मध्ये रोशनने तलतबरोबर अनहोनी, रागरंग, संस्कार ह्यातील गाणी केली पण अखेर मुकेशबरोबर परत शीशम हा चित्रपट केला.एक झुटीसी तसल्ली वो मुझे देके चले हे गाणं खरं तर मुकेशने पेलललं आहे असं मला वाटतं. गजलशैलीतलं हे गाणं आहे. चाल वाद्यवॄंद अगदी साधं आहे. पण मुकेशचा आवाज हॄदय स्पर्शून जातो. दु:खी जीवाचा तळतळाट दाखवणारे सतायेगा किसे तु आसमां जब हम नही होंगे हे गाणं ही तसंच्.अगदी शांतपणे बनवलेली गाणी आहेत. किमान वाद्यवॄंद आणि गायकाच्या आवाजाचा प्रभावी वापर. गाण्याचे शब्द आहे छान आहेत.ह्यात लता-मुकेशचं “सपनोंमें आना छेड छेड जाना” हे गाणं पण आहे. मला ते अजिबात आवडत नाही.१९५३च्या “माशूका”मध्ये”ओ दिल ना लगाना असा सल्ला मुकेशने रोशनच्या संगीत दिग्दर्शनाखाली दिला. पण मला हे गाणं सामान्य वाटलं. ऐकू येत नाही म्हणून दुवापण दिलाय.१९५४च्या चाँदनी चौकमध्ये हमें ऐ दिल कहीं ले चल बडा तेरा करम होगा हे सुंदर गाणं मुकेशने म्हटलं, तर १९५५ च्या “घर घर में दिवाली”मध्ये आधे उधर है और आधे ईधर हे हलकं फुलकं गाणं, टांग्याच्या टापांच्या तालावर म्हटलं. मुकेशचा आवाजही ह्यात वेगळाच येतो. हे गाणं टिपीकल नैय्यर शैलीतलं वाटतं.१९५४ नंतर रोशन्-मुकेशचं गाणं थेट १९५९मध्ये “मैने जीना सिख लिया”मधे तेरे प्यार को इस तरह से भुलाना. अगदी कमी ऐकलेलं आणि फार सुंदर गाणं आहे हे.मग १९६०च्या “वॉरंट”मध्ये नैनोंमें क्यों आन बसेहे परत एकदा टांग्यातलं हलकं फुलकं गाणं. हे गाणं परत एकदा ओ.पी.ची आठवण करून देतं.लगेच १९६१मध्ये “सुरत और सीरत”मधेबहोत दिया देनेवाले ने तुझेहे एक गाणं आहे.पण दोघांचीही चमक त्यात दिसत नाही.त्यानंतर मात्र १९६३ साली “दिल ही तो है”मध्ये दोघांनी परत आतषबाजी केली आहे.तुम अगर मुझको ना चाहो, भुले से मुहोब्बत कर बैठा, चुरा ले ना तुमको ये मौसम आणि तुम्हारी मस्त नजर एकेक गाणं म्हणजे जुनी जादू कायम असल्याचीच पावती होती.सहज एक नोंद १९६३ मध्ये रोशनने संगीतकार म्हणूनच “कमर्शियल पायलट ऑफिसर”ह्या विचित्र नावाचा चित्रपट केला होता. लगेच १९६५च्या “नयी उमर की नयी फसल”मध्ये परत दोघे बॅड पॅच मधे असल्यागत हे गाणं केलं.मात्र ३ वर्षात त्यांची एकत्र अशी खास कामगिरी झाली नाही, मग नियमानुसार किमान ३ वर्षं गॅप झाली म्हणून दोघांनीही बाह्या सरसवून एकत्र काम केलं आणि त्याचा परिणाम? “देवर”. ह्यातील रोशनच्या चाली आणि मुकेशचा आवाज ह्यातील “दर्द”एव्हढा कमालीचा होता की “गरम धरम्”सुद्धा मुकाट्याने नाक न फेंदारता, दु:खी गाणी म्हणू लागला.आया है मुझे फिर याद वो जालिम, बहारोंने मेरा चमन लुटकर ही दोन अप्रतिम गाणी एकत्र केली.१९६८ मधलं सदाहरीत ओहरे ताल मिले नदी के जल मेंहे दोघांनी एकत्र केलेलं बहुदा जल में.१९६७ सालीच रोशन हॄदयविकाराने देवाघरी गेला.आज हे दोघंही आपल्यात नाहीत, पण त्यांची ही सुंदर गाणी आपल्याला आणि नंतरच्यांना सुद्धा रिझवत राहातीलच!!!

अनहोनी

संगीतकार रोशन ने काही अतिशय दर्जेदार संगीताने नटलेले चित्रपट दिले.त्यामानाने त्याला यश अगदी मर्यादीत लाभलं, पण त्याची गाणी आजही अनेक जण आवडीने ऐकतात. असाच एक दर्जेदार गाण्याने नटलेला चित्रपट म्हणजे “अनहोनी”. राज कपूर,नर्गीस,आगा,डेव्हिड,अचला सचदेव,बद्रीप्रसाद्,ओमप्रकाश अभिनीत हा चित्रपट १९५२ साली आला. ख्वाजा अहमद अब्बास निर्मित-दिग्दर्शीत हा चित्रपट होता. संगीत रोशनचं होतं,तर गीतकार होते सरदार अली जाफ्री, नक्शब,संतोषी,सत्येंद्रा आणि शैलेंद्र. तलत महमूदने राज कपूरसाठी पार्श्वगायन केलं होतं. नर्गीसची दुहेरी भुमिका होती एक श्रीमंताघरची लेक आणि दुसरी कोठ्यावरची गायिका आणि ह्या दोघींना अनुक्रमे लता आणि राजकुमारी ह्यांनी पार्श्वगायन केलं. तूनळीवर हा चित्रपट येथे पाहता येईल.
आता ह्यातील गाण्यांविषयी आणि त्यातही सर्वप्रथम तलतविषयी. रोशनची जोडी मुकेश-रफीबरोबर जास्त खुलली असं मला वाटतं.तलतलाही त्याने चांगली गाणी दिलीत उदा:- मेरे खयालोंमें आके गले लगा जा मुझे हे गुनाह मधले आर्त गीत किंवा संस्कारमधलं मुहोब्बत के झूटे सहारोंने लूटा हे गीत, पण त्याचबरोबर हे ही खरं की रोशन म्हटलं की मुकेश आणि रफीची जेव्हढी गाणी आठवतात तेव्हढी तलतची आठवत नाहीत. असो…तर रोशन-तलत जोडीचं मैं दिल हूं एक अरमान भरा हे गाणं….ये झिलमिल करते हुये दिये हे गाणं ऐका…हळूवारपणे वाजणारी पियानो आणि व्हायोलिन्स ह्यांच्या सुंदर वाद्यसंगमातून हे गाणं सुरू होतं आणि मग तलतचा मखमली आवाज हे गाणं पुढे नेतो. रोशनने जलतरंग आणि तत्सम वाद्यंही बरेचदा वापरलीत आणि हे गाणंही त्याला अपवाद नाही. तालासाठी अंतर्‍यात गिटार वापरली आहे, आणि अन्य तालवाद्य अगदी हळूवार वाजवली आहेत. मात्र राज + तलत जोडी शोभत नाही हे खरंच.
पुढंची दोन गाणी म्हणजे तलत-लताची द्वंद्वंगीतं एक आहे. दोन्ही अतिशय हळूवार आणि गोड आहेत. लता आणि तलत गाणार म्हणजे प्रश्नच नाही अतीव गोडवा…समाके दिलमें हमारे जरा खयाल रहे ह्या गाण्यात फ्लुट, जलतरंग आणि पियानोचा मुबलक वापर करून गाणं खुलवलंय. पुढचं गाणं आहे मेरे दिलकी धडकन क्या बोले हे गाणं टेलीफोनवरून गायलं जातं. ह्या टोकाला नर्गीस, त्या टोकाला राज कपूर. तलत आणि लताचे आवाज ह्या गाण्यात गोडव्याची परिसीमा गाठतात…किती किती म्हणून गोड गावं?? इथेही रोशनसाहेबांची लाडकी बासरी, जलतरंग आहेच. गाण्याचा ठेकाही गोड आहे.
पुढची गाणी म्हणजे कहर आहेत. त्यामुळे मी फक्त दुवे चिटकवून देणार आहेत. गाणी आहेत
शरीफोंकी मेहेफील में दिल गया राजकुमारी ह्या गायिकेने गायलेलं हे गाणं तिला जास्त संधी का मिळाली नाही ह्याची रूखरूख मनी निर्माण करतं
जिंदगी बदली मुहोब्बत का मजा राजकुमारी-लता ह्यांनी गायलेलं गाणं. राजकुमारीने जलद आणि किंचीत चंचल भावदर्शक चाल गायल्येय तर लताने हळुवार आणि नवथर भावना दर्शविणार्या ओळी गायल्यात, पण दोघीही चोख..लता असताना भाव खाऊन जाणं येर्या गबाळ्याचं काम नोहे.
आता पुढे लताचं गारूड सुरू होतं. इस दिलकी हालत क्या कहिये जो शादभी है नाशादभी है ही कळ लता अगदी अचूकपणे आपल्यापर्यंत पोचवते. खास लताशैलीचं हे गीत, आणि बाईंचा धारदार आवाज थेट काळीज चिरून आत रूततो.
कहा है उन्होंने ये राजे मुहोब्बत हे उडत्या चालीचं कोठ्यावरचं गाणं. ठुमरी वगैरे स्टाईल असावी. इथेही बाई चोख. बोलायचं काम नाही…फक्त ऐका…
एकंदरीतच अनहोनीला रोशनने अप्रतिम संगीत दिलय आणि मला त्यातली गाणी खूप खूप आवडतात. तुम्हालाही आबडतील अशी आशा आहे.

केनेथ क्लार्क आणि त्याचे सिव्हिलायझेशन-प्रस्तावना

केनेथ क्लार्क (१९०३-१९८३) हा एक प्रसिद्ध ब्रिटिश लेखक, संग्रहालय संचालक, निवेदक आणि सुप्रसिद्ध कला-ईतिहासकार होता. ऒक्सफर्ड महाविद्यालयात ईतिहास विषय घेऊन त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. १९३३ साली, वय अवघे ३० असताना तो नॆशनल गॆलरीचा संचालक म्हणून नेमला गेला. तिथे त्या पदी निवड झालेला तो सर्वात तरूण संचालक होता. १९४६ साली लिखाणाला वेळ देण्यासाठी त्याने हे पद सोडलं आणि १९४६-१९५० ह्या काळात तो ऒक्सफर्डमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होता. त्याला खूप मान-सन्मान मिळाले,पण त्याचं नाव झालं ते १९६९ साली बी.बी.सी.ने प्रसारीत केलेल्या सिव्हिलायझेशन ह्या मालिकेमुळे. १३ भागात सादर केलेली ही मालिका पश्चिम युरोपच्या कला-ईतिहासावर एक नजर आहे असं म्हणता येईल. मालिका लोकप्रिय झाल्यावर त्या मालिकेत केनेथ क्लार्क ह्याने जे निवेदन केलंय त्याचंही पुस्तक प्रकाशित झालं आणि ते सुद्धा गाजलं. त्याच पुस्तकाचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांना हि मालिका बघायची आहे त्यांनी Civilisation ह्या दुव्यावरून सुरूवात करावी. हा पहिला भाग आहे. बाजूलाच बाकी भागांचे दुवे सापडतील.

१९६९ च्या सुमारास बीबीसीला कलांवर एक चित्रपटमालिका हवी होती आणि त्याबाबत क्लार्क सल्ला देऊ शकेल असं त्यांना वाटलं. पण जेव्हां डेव्हीड ऎटनबरो क्लार्कशी चर्चा करत होते तेंव्हा त्यांनी “सिव्हिलायझेशन” हा शब्द वापरला आणि त्या शब्दाने उत्साहीत होऊन क्लार्कने हा आराखडा बनवला. अर्थातच दूरचित्रवाणी मालिका १३ भागांचीच होती, त्यामुळे चीन, भारत, पर्शिया, ईजिप्त इत्यादी अनेक संस्कॄत्या घ्यायचा मोह टाळावा लागला. त्या वगळल्या त्याचं अजून एक कारण म्हणजे त्या भाषा त्याला अवगत नव्हत्या. क्लार्कचं मत होतं की,”कुठल्याही संस्कॄतीची ओळख तिच्या भाषेतूनच योग्य प्रकारे होते. भाषेतले शब्द, वाक्प्रचार, म्हणी, बोलण्याची ढब, लोकांच्या प्रतिक्रीया त्या संस्कॄतीचं रूप उभं करतात”.

पुस्तकाच्या प्रस्तावनेपासुनच केनेथ क्लार्कची एकूण माध्यमाची जाण दिसून येते.दूरचित्रवाणीसाठी लिहीणं कसं वेगळं आहे ह्याची मीमांसा करताना तो म्हणतो,”दूरचित्रवाणीसाठी लिहिणे हे मुळातच वेगळे आहे, फक्त शैली आणि सादरीकरणाबाबतच नव्हे तर विषयाकडे बघण्याचा दॄष्टीकोनसुद्धा वेगळा हवा. संध्याकाळी दूरचित्रवाणीसमोर बसणार्यांची मनोरंजनाची अपेक्षा असते. त्यांना कंटाळा आला तर ते दूरचित्रवाणीसंच बंद करतात. त्यांना जे दिसतं त्याने जितकं त्यांचं मनोरंजन होतं तितकच मनोरंजन ते जे ऐकतात त्यानेही होतं. त्यांचं लक्ष काळजीपूर्वक विणलेल्या दॄष्य-साखळीने वेधून घ्यावं लागतं आणि अनेकदा ही दॄष्य-साखळीच विचारांना दिशा देते.” दूरचित्रवाणीवर सादर होणार्‍या अभ्यासू कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी मत व्यक्त करताना तो म्हणातो ,”आपण संध्याकाळी चहा पीत गप्प मारत बसतो तेंव्हा असंच बोलतो. आणि टी.व्ही.ने हे असं गप्पा-टप्पांच स्वरूप जपावं असं मला वाटतं”. तो पुढे असंही म्हणतो ,”मला असं वाटतं की दॄष्य, संगीत, रंग, हालचाली ह्यांचा एकत्र परीणाम जो अनुभव देतो तो शब्दांना देणं शक्य नाही, आणि म्हणून मला टी.व्ही.माध्यम म्हणून विश्वासार्ह वाटलं आणि दोन वर्षांचं लिखाण बाजूला सारून ह्या माध्यमाच्या शक्यता पडताळून पहायला मी सरसावलो”. पुस्तकाला दॄक-श्राव्य परिणाम देण शक्य नाही म्हणूनच
पुस्तकात मालिकेतील काही अप्रतिम गोष्टी निसटल्या आहेत. एखादी गोष्ट केवळ दॄष्य मालिकेने लोकांवर बिंबवता येऊ शकते पण पुस्तकात त्यासाठी अनेक पानं खर्ची घालावी लागतील.एव्ह्ढ स्गळं असूनसुद्धा हे पुस्तक लिहून प्रकाशीत होऊ देण्यामागची भूमिका मांडताना तो म्हणातो,”मला एक तर नकर देणं जड जातं, दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्यात गाही मतं अगदी ठामपणे मांडल्येत, मला स्वत:च मत आहे हा साक्षात्कार मला इथे झाला आणि मी तो मोह आवरू शकलो नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हण्जे ह्या कलेच्या ठेव्याने मागच्या ५० एक वर्षात मला जो निखळ आनंद दिलाय, त्याबाबतची माझी ही कॄतज्ञता आहे”.

ह्या मालिकेच्यावेळी क्लार्कने कुठल्या दॄष्टीकोनातून विचार केला होता आणि कोणाला घ्यावं, कोणाला वगळावं हे कसं ठरवलं याबाबत एक मार्मिक भाष्य प्रकाश टाकते. “जर असा प्रश्न विचारला की मानवाचा आवाका वाढवून त्याला ४ पावलं पुढे नेईल असं स्पेनने काय केलं? तर फार काही हाती लागणार नाही. माझा मुख्य विचार प्रत्येक भागात युरोपिअन मानसिकतेतील एक महत्त्वाचा टप्पा दाखवणं हा होता त्यामुळे स्पेन बाहेरच राहिलं”.

एकंदर युरोपिअन कलेच्या अनुषंगाने मानवी संस्कॄतीचा आणि एकंदर प्रगतीचा आढावा ह्या मालिकेतून क्लार्क घेतो. त्याचवेळी तो कलेतील झालेले फरक आणि त्यावरून तत्कालिन संस्कॄतीची मानसिकताही उकल करून सांगतो. ईतिहासातील घटना,आणि कलेच्या अनुषंगाने त्याचं विष्लेषणही तो करतो.

पुढे – पहिले प्रकरण – द स्किन ऒफ अवर टीथ

चतुर्मुखी

अलीकडेच शरश्चंद्र टोंगो ह्यांची चतुर्मुखी ही कादंबरी परत वाचली. नेहेमीसारखीच अनेकदा वाचूनसुद्धा ती टवटवीत वाटली. तसं पाहिलं तर ह्या लेखकाच्या दोनच कादंबर्‍या मी वाचल्यात. त्यांनी पुढे लिहीलंय का नाही हे सुद्धा मला ठाऊक नाही.त्यांची मी वाचलेली पहिली कादंबरी म्हणजे “उचल्या”. पूर्वी जेंव्हा बालपणीचा काळ सुखाचा असायचा, तेंव्हा ऊन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मॅजेस्टीक प्रकाशनातर्फे किशोर आणि कुमारांसाठी पंचरंगी मेवा प्रसिद्ध व्हायचा.ह्यातच अनेक अप्रतिम पुस्तकं वाचली. बालपणावर अगणित उपकार असणारे भा.रा.भागवत ह्यांच्या अनेक कादंबर्‍या तेंव्हाच वाचल्या.सौ.लीलावती भागवतांची चल ऊडूनी पाखरा ही कादंबरीही तेंव्हाच वाचली.साधरणतः मनोरंजक आणि उपदेशपर असं ढोबळ वर्गीकरण करता येऊ शकेल.अशा वेळी वास्तववादी कादंबर्यांनी भोवतालच्या वास्तवाची जाणीव करून संवेदनाक्षमही बनवलं.सुधाकर प्रभु ह्यांची सातववाडीचा लहान्या, आम्ही सागराची बाळे तर शरश्चंद्र टोंगोंची “उचल्या”. उचल्या ही एक चोख टीन एज नॉव्हेल म्हणता येईल. कारण किशो-कुमारांच्या तुलनेने गंभीर वळण घेणारं कथानक होतं तिच. त्या एका कादंबरीने टोंगो मनात घर करून बसले आणि उत्सुकतेने त्यांचं इतर साहित्य शोधता हाती लागली ती फक्त ही “चतुर्मुखी”.

कादंबरी खूप मोठी नाही. १४२ पानं फक्त. आकारही आटोपशीर आहे.जेमतेम वीतभर. हे सांगतो अश्यासाठी की ह्या कादंबरीत १९४२-४३ ते १९७७-७८ एव्हढा मोठा कालखंड आला आहे. कादंबरीचं वैशिष्ट्य तिच्या रचनेत आहे. चार जणांनी सांगितलेली ही गोष्ट म्हणून चतुर्मुखी.तर कथा सांगणारे आहेत, अनुक्रमे बाबा, सनी, अजीत आणि प्रतिमा. दोन १९४२-४३ मधले तरूण आणि दोन १९७७-७८ मधले तरूण.बाबा आणि सनी हे दोन भिन्न कौटुंबिक पार्श्वभुमी असलेले मित्र. यवतमाळमध्ये रहाणारे. बाबा गरीब तर सनीचे वडील गावात एक्स्ट्रॉ असिस्टंट कमिशनर आहेत.बाबाच्या कथनाची सुरूवातच सनीच्या नाहीश्या होण्याने होते. हळूहळू सनी, त्याच्या घरचे, शाळेतले शिक्षक, काही प्रसंग, काही घडामोडी ह्याचा थोडा थोडा, पण पुरेसा तपशील देत देत सनीशी जुळणार्‍या एका व्यक्तीचं प्रेत सापडतं आणि त्याच वेळी सनीच्या वडलांची बस्तरच्या राजधानीला बदली होते. इथे बाबाचं कथन संपते आणि सनीचं सुरू होतं. बाबाच्या कथनातलेच धागे दोरे घेत घेत सनी त्याची कथा पूर्ण करतो.इथून दुसरा टप्पा सुरू होतो १९७७ साल. अजीत त्याची कथा सुरू करतो. त्याच्या कथनात ३० वर्षांपूर्वीचे अजून काही धागे-दोरे परत मिळतात आणि कादंबरी संपेस्तोवर कळतं की बाबा आणि सनीची पुढची पिढी उरलेलं कथानक सांगत्येय.अल्पावधीत चांगले मित्र झालेल्या दोघांनी ही कथा सुरू केली. सुरूवात त्यांच्या दुरावण्याने होते, पण शेवटी त्यांची पुढची पिढी, जी एकमेकांच्या अस्तित्वाविषयी/नात्याविषयी अनभिज्ञ आहे, त्यांची भेट होणार हे स्पष्ट होतं.

मला सगळ्यात भावलेली गोष्टं म्हणजे कादंबरीची रचना. तसा बराच मोठा कालखंड ह्या कादंबरीने व्यापला आणि हा कालखंड ४ भागात वाटून, २ जुन्या आणि २ नवीम पिढीतील पात्रांनीच कथा सांगयची हा प्रयोग चांगलाच जमला आहे. पुस्तक छोटं असलं तरीही यवतमाळ, नागपूर, मुंबई, पुष्कर, अजमेर इ.इ.खूप ठीकाणं येऊन जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारची माणसंही येतात. मोजक्या शब्दात व्यक्तीरेखा उभं करण्याचं कसब लेखकाकडे आहे. तसंच वेगवेगळे प्रसंग सुद्धा कसलाही फापटपसारा न लावता योग्य तपशीलासह उभे केले आहेत.कथेचे चार भाग केले असले तरी प्रत्येक भागात न जुळणार्‍या/अर्धवट राहिल्या अश्या वाटणार्‍या गोष्टी पुढे नीट जोडल्या आहेत.ह्या काळात विचारसरणीत झालेले बदल, मानसिकता इ. गोष्टी सुरेख टीपल्या आहेत.बाबा आणि सनीच्या कथनाचा भाग हा तत्कालीन रोमँटीसिझम शैलीचा वाटतो तर अजीत आणि प्रतिमा ह्या पिढीचं कथन जास्त गडद आहे…त्या काळाचं प्रतिबिंब…जेंव्हा बेकारी हा युगधर्म झालाय की काय असं वाटत होतं, वशिलेबाजीशिवाय सिनेमाचा डोअरकीपरपण होणं अवघड होतं असा तो काळ.

ह्या छोटेखानी कादंबरीत अनेक व्यक्तीरेखा आल्यात. श्यामली आणि कविता ह्या दोघी तर लक्षात रहाण्यार्या आहेत. त्याशिवाय काका, बडेबाबू, केदार गुरूजी, कादर, बल्लूवस्ताद अशी खास पात्र आहेत.टोंगो छोट्या छोट्या वाक्यात व्यक्तीरेखा उभ्या करून वाचकांपर्यंत पोहोचवतात.त्यांची काही वाक्यंही खास आहेत. उदा:- हरणाची पाठ काळी पाडेल असं उन होत. कादंबरी सतत गतीमान रहाते. अनावश्यक संथ ही होत नाही की फारच जलदही जात नाही. आपल्याच एका मस्त धीम्या लयीत ती पुढे जात रहाते.

तर तुम्हीसुद्धा वाचा आणि जरूर कळवा तुम्हाला काय वाटतं ते.

चतुर्मुखी – लेखक – शरश्चंद्र टोंगो – सरस साहित्य पुणे ९, प्रथमावॄत्ती १९७८ (एकच निघाली).

सी.रामचंद्र – भाग ७

१९५८ सालापासून अण्णांची घसरण सुरु झाली. ह्याच सुमारास लताशीसुद्धा त्यांचे तीव्र मतभेद झाले आणि लता काही काळ अण्णांकडे गाईनाशी झाली.रफी-मुकेश हे त्या सुमारास प्रमुख आवाज म्हणून पक्के झाले होते. मुकेशला राज कपूरची पसंदी होती तर रफीला दिलीपकुमारची.देव आनंद आणि बर्मनदादा किशोरकुमार, हेमंतकुमारला पसंदी देत, पण खरी बाजी रफीनेच मारली. तो सर्वांसाठी सारख्याच परीणामकारकपणे गायचा. त्याचसुमारास नय्यर युगाची सुरूवात झाली.१९५४ ला आरपार ह्या बोलपटाद्वारे इशारा देणार ओ.पी. एक वजनदार नाव झाला होता. शंकर-जयकिशन, रोशन, मदन मोहन हे नव्या दमाचे संगीतकार होतेच. लता आणि रफी न वापरल्याचा अण्णांच्या संगीतावर परिणाम झालाच. त्यांनी नेमकी तुलनेने डावी गाणी रफीला दिली तर अनेक उत्तम रचना महेंद्र कपूरला देऊन त्यांची माती केली. असो.
१९५८ साली अण्णांचे अमरदीप, कारीगर, राजतिलक आणि तलाक हे ४ बोलपट आले. ह्यापैकी फक्त तलाक चालला.बहुदा कारीगरमध्ये स्व.सुधीर फडके अण्णांकडे गायले. राजतिलकमधील गाणी सुद्धा फार गाजली नाहीत. अमरदीपची मात्र काही गाणी बेफाम गाजली.असं असल तरी, बिनाका गीतमालामध्ये ती पहिल्या १५ मध्ये सुद्धा नव्हती. नंतर एका लेखात राजू भारतन ने ह्याबद्दल अमीन सयानीला दोष दिला होता. असो. अमरदीपमध्ये रफी-अशाने गायलेले,”देख हमें आवाज ना देना” हे अप्रतिम द्वंद्वगीत २ भागात होत. तसंच लताने गायलेले, ठेकेदार,”मेरे मनका बावरा पंछी क्यूं बार बार डोले” ही दोन्ही गाणी गाजली.तसेच “दिलकी दुनिया बसाके सांवरीया तुम न जाने कहां खो गये” हे गाण सुद्धा गाजल. ह्या गाण्याविषयी अण्णा एकदा म्हणाले होते,’एका कव्वालाकडून ऐकलेला मध्यम माझ्या कानात बसला होता, तोच मी ह्या गाण्यात लावला. गाण्यात एव्हढ काही खास नाही, पण त्या मध्यमामुळे गोड लागत”.आशाने सुद्धा कमाल केली होती,”किसी दिन जरा देख मेरा भी होके”, “लागी अपनी नजरिया कटार बनके” ह्या दोन गाण्यांसोबतच,”ये जी चाहता है किसी दिन मैं तेरी” हे केवळ अशक्य असं दु:खी गीत म्हणत काळजाला हात घातलाय.मुखडा हळुवार तर अंतरा वरच्या सुरात आणि परत ध्रुपद खालच्या सुरात असं हे गाण खूप गोड आहे.

तलाक बोलपटात अण्णांनी फक्त आशाचा आवाज वापरला आणि पुरूष गायकात, मन्ना डे आणि महेंद्र कपूर वापरले. पण उत्तम काम करूनही मन्ना डॅ ऐवजी नंतर महेंद्र कपूरलाच संधी मिळाली. असो. तलाकमधील “ऐ जी ओ कुछ तो बोलो” हे आशा आणि महेंद्र कपूरची द्वंद्वगीत अवीट गोडीच आहे. मन्नाबाबूंनी आशाबरोबर,”मेरे जीवनमें किरन बन के” हे सुंदर द्वंद्वगीत तर “संभल के रेहेना अपने घरमें छुपे हुए गद्दारो सें” हे समरगीत म्हटल. माझ्या आठवणीत राजेंद्रकुमारवर चित्रीत झालेलं हे एकमेव गीत आहे ज्यात त्याने गाण्याला पूरक आणि चांगला अभिनय केलाय.

सी.रामचंद्र – भाग ६

१९५७ साली अण्णांचे ५ पैकी ४ बोलपट दणक्यात हिट झाले. ह्या वर्षी आलेले बोलपट होते, आशा, बारीश, नौशेरवान-ए-आदिल, शारदा आणि तलाश. पैकी शारदा सोडून सर्वच चालले. शारदासुद्धा चालला, पण इतर बोलपटांइतका नाही.
आशा हा किशोरकुमार-वैजयंतीमाला आणि प्राण अभिनित बोलपट. ह्यात अण्णांनी किशोर, लता आणि आशा ह्या तिघांचाही सुरेख उपयोग करून अप्रतिम स्वर-रचना केल्या. लताच्या मधुर आवाजात, “जरा रूक रूक के”, “तु ना आया और होने लगी शाम रे” आणि “चल चल रे कन्हाई छलिया” ह्या अप्रतिम रचना सादर केल्या. पहिल्या दोन गाण्यात लताचा आवाज खूपच गोड वाटतो, आणि हा गोडवा जवळ जवळ अण्णांच्य  सर्वच रचनात आढळतो. तिसर गाणं हे अण्णांचा अजून एक खास राखीव प्रांत होता,हे म्हंजे लता स्पेशल अण्णा रचना म्हणायला हरकत नाही. ह्यात लताचा गोडवा अजूनच खुलतो आणि जेंव्हा ती वरच्या सुरात जाऊन आलाप घेते तेंव्हा तर….ऊफ्फ्फ….अनेक रचनांप्रमाणे ह्यातही अत्यंत नाजूक वाद्य रचना आहे.

किशोरकुमारच्या खट्याळ आवाजात गायलेल ईना मिना डिका अजूनही निनादत आहे, पण त्याच किशोरच्या आवाजातील गंभीर छटेचा आणि विषण्णपणाचा सुरेख आणि सुरेल वापर करून,”हाल तुझे अपनी दुनिया का नजर तो आता होगा” हे विषण्णतेचा सुर लावणारे गाणं दिल.

आशाबाईंनी अण्णांकडील आपले बस्तान मजबूत केले आणि त्यांनी “ईना-मिना-डिका” हे धम्माल गाण तर म्हटलच, पण त्याच बरोबर “सो जा रे चंदा सो जा, चंदनिया अरज करे” ही अजून एक अप्रतिम रचना गाईली. अण्णांच्या हातखंडा अंगाईला बोलपटातील प्रसंगानुरूप टच देऊन हे गाण बनवल होतं. नायक किशोरकुमार विमनस्क मनःस्थितीत खलनायकापासून (प्राण..अजून कोण) लपायला नायिकेकडे येतो. तिला वस्तुस्थिती कळलेली असते आणि ती एकाच वेळी आर्जव करायचा, धीर द्यायचा, समजूत काढायचा आणि शांत करायचा प्रयत्न करत असते.
हे सगळे भाव चालीत आणि सुरात अण्णा आणि आशाबाईंनी ओतलेत.

आशा फिल्मफेअरसाठी शर्यतीत होता पण नय्यरच्या नया दौरला फिल्मफेअर मिळाल.

बारीश हा देव-आनंद नुतनचा गुन्हेगार-पट. हा सुद्धा संगीत-पुण्याईवर रजत जयंती साजरी करता झाला. अण्णा-लताने म्हटलेले “केहेते है प्यार किसको, पंछी जर बतादे”, “फिर वोही चांद वोही हम”, आणि अण्णांनी गायलेले “दाने दाने पे लिखा है खाने वाले क नाम” ही गाणी खूप गाजली.

तलाशची गाणी मी फारशी ऐकली नाहीत. शारदा हा राज कपूर मीनाकुमारीचा चित्रपट. ह्याचं संगीत काही खास नव्हत. मुकेशला राज कपूरच्या अती-आग्रहाखतर दिलेल “जप जप जप रे” हे गाण लक्षवेधी होतं

लता-आशा ह्या भगीनींकडून एक लखलखता हिराच गाववून घेतला”ओ चांद जहां वो जाए”.

ह्या गाण्याचं वर्णन काय करू? सुरूवातीची गोड व्हायोलिन्स, तालात लागलेला तबला आणि खंजिरी, सतार, पावा…टिपिकल अण्णांची गोड सुरावट. तबला तर असला गोड वाजलाय ह्या गाण्यात की बस्स!!!!

ह्या वर्षीचा हायलाईट मात्र होता नौशेरवान-ए-आदिल. एकाहून एक अप्रतिम गाणी दिलीत अण्णांनी ह्यात. विशेष म्हणजे ज्या मिनर्व्हा मुव्हीटोनमधील नोकरी वाचवायला ते संगीत खात्यात गेले होते त्याच मिनर्व्हा मुव्हीटोनने त्यांना संगीतकार म्हणून करारबद्ध केलं. केव्हढी मोठी झेप!! लताबाईंनी गायलेले,”रात ढली, जान चली”, “भीनी भीनी है हल्की हल्की है” ही लताबाईंची गोड गाणी होती.नौशएरवान-ए-आदील मध्ये लताबरोबर रफीचा अण्णांनी मनसोक्त वापर केला. बराच काळ रफी खास काही गायला नव्हता त्याची भरपाई त्याला इथे करून दिली.”भूल जाए सारे गम” हे द्वंद्वगीत लता-रफी गायले.पण खरी जादू अण्णांनी ह्या दोन गाण्यात केल्येय. लता-रफी द्वंद्वगीतात पहिल्या क्रमांकासाठी हक्कने उभ राहू शकेल असं “तारोंकी जुबां पर है मुहोब्बत की कहानी”

आणि रफीने आपल्या आवाजातील दर्द ओतून गायलेले,”ये हसरत थी की इस दुनिया में”

सी.रामचंद्र – भाग ५

साल १९५४, ह्या वर्षी अण्णांचं संगीत असलेले कवी, मीनार, नास्तिक, पेहेली झलक, सुबह का तारा हे बोलपट आले. ह्या पैकी नास्तिक ह्या बोलपटाने चांगल यश संपादन केले. हा फिल्मिस्तानने निर्माण केलेला बोलपट होता, आणि अण्णांनी फिल्मीस्तानबरोबर केलेला शेवटचा बोलपट.
ह्या बोलपटातील देख तेरे संसार की हालत, कान्हा बजाए बंसुरी, तेरे फुलों से भी प्यार तेरे काँटो से भी प्यार, गगन झनझना रहा, अरे ओ पत्थर के भगवान ही गाणी खूपच गाजली. ह्या बोलपटाच्या संगीतात अण्णांनी वैष्णव भजनांचा छान उपयोग करून घेतला.
पेहेली झलक बोलपटातील, जमीं चल रही आसमाँ चल रहा है, चरणदास को पीने जो आदत ना होती, सखी कैसे भाए ऋत सावन की ही गाणी लोकांच्या पसंतीस उतरली. जमीं चल रही ह्या गाण्याचा तत्वचिंतनात्मक सूर एव्हढा छान लागलाय की बस्स्…….चरणदासको पीने की जो आदत ना होती हे किशोर्-कुमारने म्हटलेले गंमतीदार गाणे, तर सखी कैसे भाए ऋत सावन की हे खास अण्णा-लता टीमचे छान गाणे…भारतीय शास्त्रीय संगीताने नटलेले.
हे वर्षं अण्णा-तलत टीमचं खास वर्षं. सुबह का तारा मधे तलत-लताचं गया अंधेरा हुआ उजाला चमका चमका सुबह का तारा हे सुंदर युगल-गीत, तर विफल प्रीतीचं गीत अपनी नाकामी से मुझको काम है. ह्या गाण्यातील गिटारीचे तुकडे खूपच छान आहेत. ही अण्णांची खासियतच होती. मीनार मध्ये तलत-लताचं जरा मुडके तो देखो साजना हे युगलगीत, तर कभी तनहाईयोंमें एक ऐसी भी घडी आई ही अप्रतिम गजल तलतने गायली.
कवी बोलपट तर ह्यांच्या कामगिरीचा कळस होता. ह्यात तलतची तब्बल ७ गाणी होती. माझ्या माहीतीनुसार तलतने ५ सोलो, १ लताबाईंबरोबर युगल गीत, एक रफीबरोबर युगल गीत अशी गाणी गाईली. लताबाईंना फक्त ते तलतबरोबरचं युगुलगीत होतं ते म्ह्णजे तेरे रस्ते पे हमने एक घर बना लिया है हे अप्रतिम गीत.
१९५५ ला आझाद, दुनिया गोल है, इन्सानियत, लुटेरा, सावधान, तीरंदाज आणि यास्मिन हे बोलपट आले. इन्सानियत हा दिलीप्-देव ह्यांना घेउन बनवलेला एका तलवारपट. संगीताला भरपूर वाव होता, पण अण्णांनी निराशा केली. ह्यात तब्बल १७ गाणी होती पण चांगली फारच थोडी होती. तलत्-लताच, आई बरखा बहार लाई दिलका करार आणि रफिनं गायलेलं अपनी छाया में भगवन बिठा ले मुझे, मैं हूं तेरा तू अपना बनाले मुझे ही दोन गाणी मात्र गाजली.लुटेरा आणि तीरंदाजला पण छान संगीत दिलं होतं पण ह्यातली गाणी आत्ता माझ्या लक्षात नाहीत. यास्मिनमध्ये परत अण्णांनी धमाल उडवून दिली. हंस हंस के हसीनो ने नजर चार किये जा, मुझ पे इल्जाम्-ए-बेवफाई है, तुम अपनी याद भी दिल से, बेचैन नजर बेताब जिगर ही गाणी तूफान गाजली, पण तरीही वर्षं गाजवलं आझाद ने.
पक्षीराजा स्टुडीओने एक तमिळ बोलपट बनवला आणि तो तूफान चालला. इतका चालला की निर्माता एस्.के.एस. नायडू ह्यांनी चित्रपटाचा सेट तसाच ठेउन एक मोठा हिंदी बोलपट बनवायचे ठरवले. एका महीन्यात चित्रीकरण उरकायचे ठरवले. त्याने मुंबईला येउन दिलीपकुमार आणि मीनाकुमारीला करारबद्ध केले आणि नौशादला संगीतकार म्हणून करारबद्ध करायला गेला. पण एका महीन्यात संगीत द्यायचे, ते ही ८-१० गाणी हे ऐकून नौशाद उखडला आणि त्याने नायडूकडे असमर्थता व्यक्त केली. अखेर नायडूला कोणीतरी(की खुद्द नौशादनेच) राम चितळकरांचं नाव सुचवलं. नायडू चितळकरांच्या दारी आला. अण्णांनी सर्व-प्रथम नौशादहून जास्त मानधनाची अट कबूल करून घेतली. यथावकाश अण्णा आणि गीतकार राजेंद्र कृष्ण मद्रास शहरी दाखल झाले. एका हॉटेलमध्ये नायडूनी व्यवस्था करून ठेवली होती. पुढचे ७-८ दिवस अण्णा आणि राजेंद्र कृष्ण हे दोघेही मद्रास भटकत होते आणि मजबूत खात पीत होते. असं करता करता आठवडा गेला. नायडूला गाण्यांची काळजी वाटू लागली. त्याच बाकी चित्रीकरण आटपत आलं होतं आणि फक्त गाण्यांचं चित्रीकरण राहाणार होतं. अखेर एक दिवस नायडू भडकून हॉटेलवर आला आणि मी गाणी घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी धमकी दिली. अखेर हा जीव असाच पिडत राहील हे जाणून संध्याकाळी अण्णा हर्मोनियमवर बसले. राजेंद्र कृष्ण समोरच सिगारेटचं पाकीट घेउन बसला, पा़कीटावरच सटासट गाणी लिहीत गेला आणि अण्णा पटापट चाली देत गेले. सकाळपर्यंत ९ गाणी तयार झाली होती आणि नायडूकडे ते कागद देऊन आता रेकॉर्डिंगचं बघा असं म्हणून, हे दोघं परत दंगा करायला मोकळे.
आझादचं रेकॉर्डींगही झटपट आटपलं. त्याकाळी रेकॉर्डींगसाठी मेणाच्या तबकड्या वापरत आणि त्या फक्त ३ मिनिटाचं रेकॉर्डींग करू शकत. काही चूक झाली तर आख्खी तब़कडी वाया जात असे. गाणं लांबलं तर फक्त ३ मिनिटांचच गाण रेकॉर्ड होत असे. पण लताबाईंनी गायलेले जा री जा री ओ कारी बदरीया हे गाण एकाच टेक मध्ये ओ.के. झाल. कितना हंसी है मौसम हे गाणं रेकॉर्ड होताना, तलत येउ शकला नाही, त्यामुळे ते गाणं अण्णा स्वत:च गायले. ते गाणं इतक्या मुलायम आवाजात गायले की अनेक जण गायक तलत आहे असं समजून फसले. गीतकार शैलेंद्र ने तर अण्णांशीच १०० रू. ची पैज लावली आणि अर्थातच तो हरला..
१९५६ साली अण्णांचे ३ बोलपट आले. २६ जनवरी, शतरंज आणि देवता. पैकी शतरंज आणि देवता खूप चालले. शतरंज मधले बदली छुपे चांद ने कुछ मुझसे कहा है हे लता-हेमंतचं गाणं गाजलं. देवतामधील अनेक गाणी गाजली. सगळ्यात गाजलेले आणि अनेक जणांनी ऐकलेले गाणं म्हणजे कैसे आउं जमुना के तीर हे लताबाईंनी गायलेले भैरवीतले गाणे. अण्णांनी ह्यात लताबाईंना अजून एक वेगळे गाणं दिलय, जालीम तेरी आखों ने क्या चीज पिलाई है….लताबाईंनी आपल्या गोड आवाजात सगळी मादकता आणून ते गाणं म्हटलय. तसंच ऐ चांद कल जो आना, सूना है मेरे दिल का जहां ही गाणी आणि खास अण्णांची हातखंडा अंगाई दो नैनो का बना झूलना. आशाबाईंनी खास आपल्या मादक शैलीत आणि खणखणीत आवाजात म्हटलेले फूलोंके मेले हम है अकेले आणि लता-तलतचं सुमधुर युगुलगीत, किसी से प्यार है हमको मगर हम ना बताएंगे.

सी.रामचंद्र – भाग ४

१९५२ साल सुरेल संगीताचा वर्षाव करण्याची परंपरा घेउन आलं. ह्या साली अण्णांनी छत्रपती शिवाजी ह्या मराठी बोलपटाला सुद्धा संगीत दिलं. ह्या शिवाय घुंगरू, हंगामा, परछांई, साकी आणि शिनशिनाकी बुबलाबू ह्या बोलपटांना संगीत दिलं. घुंगरू मधली दिले बेकरार सोजा, मै अपने दिल का अफसाना सुना लुं, काली काली रतीयां याद सताए, बदनाम हो रहा है ही खास लता-अण्णा स्टाईल गाणी अवीट गोडीची आहेत. हंगामा मधील, तेरे दर से खुशी मांगी मगर गम दे दिया तुने, मेरी सखी बता, झूम झूम झूम झूम रही प्यार की दुनिया(लता-चितळकर) ही गाणी गाजली. ह्याच्याच थोडं आधीची गोष्ट…..तलत महमूद पार्श्वगायक म्हणून गाजू लागला होता. आपल्या हळुवार, मृदु-मुलायम आणि कंप असलेल्या आवाजात गायलेली गाणी लोकांचा हळवा कोपरा बनली होती. विशेषतः दिलीप-तलत जोडी खास जमली होती. माधव मोहोळकरांनी गीतयात्री मधे लिहिलं, “आमचा लाडका भग्नहृदयी प्रेमवीर दिलीप, जेंव्हा वठलेल्या झाडाजवळ बसून, तलतच्या आवाजात ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल म्हणताना पाहिला तेव्हां किती किती आनंद झाला.” बाबुलनंतर एका संगीतकाराने त्याला त्याचा कंप हा मोठा दोष असल्याचं सांगितलं आणि तलत सपाट आवाजात गाउ लागला..त्याचबरोबर त्याच्या आवाजात दोष आहे अश्या बातम्याही पसरत होत्या. एकदा अनिलदाच्या रेकॉर्डिंगला तलत सपाट आवाजात गात होता. अनिलदा म्हणाला,”अरे तू कोण आहेस? जा इथून आणि आमच्या तलतला घेउन ये.” अनिलदाने तलतला खडसावून सांगीतल की हा नैसर्गिक कंपच तुझा मोठा ठेवाठेवा, नाहीतर गल्लोगल्ली तलत सापडेल. तलत मग नवीन आत्मविश्वासाने गात होता. अण्णांना दुसरे अण्णा म्हंजे शांतारामबापूंनी परछांईसाठी करारबद्ध केलं. अण्णांनी पहिले छूट सांगितलं,”माझ्या रचना लताच गाईल, जयश्रीबाई नाही”. बापू कबुल झाले नंतर एका गाण्यासाठी चाल बांधून अण्णा चर्चा करायला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या कल्पनेहुन वेगळ्या प्रकारे चित्रीकरण होणार आहे. बापूंशी लगेच चर्चा झाली आणि बापूंनी अण्णांना नवं गाणं रचायला अवधी दिला आणि शुटींग थांबवलं. अण्णा चाल बांधून गायकाचा विचार करत चालले होते आणि एकदम मदनचं आशियाना बोलपटाचं रेकॉर्डिंग आहे हे आठवलं म्हणून स्टुडिओत डोकावले तर तलत आपल्या मधुर आवाजात गात होता,”मेरा करार ले जा मुझे बेकरार कर जा”. गाण संपल्यावर अण्णा म्हणाले,”अरे तलत तुझ्या आवाजाला काहीच धाड भरली नाही..मी भलतच ऐकल होत..खैर, उद्या ये, आपल्याला गाणं रेकॉर्ड करायचय. दुसर्या दिवशी परछांईमधल, मुहोब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने” हे गाणं रेकोर्ड झाल. माधुर्य हे अण्णांच्या संगीताचा स्थायिभाव होतं. स्त्री गायिकात लता आणि पुरूष गायकात तलतने ह्या माधुर्याची पुरेपुर बरसात रसिकांवर केली. तलतने गायलेली अण्णांची गाणी ऐकताना हा गोडवा जास्त प्रकर्षाने अधोरेखीत होतो. तलतने अण्णांविषयी म्हटले होते,”अण्णा म्हणजे राजा माणूस. एखाद दिवस फोन वाजायचा,”तल उद्या रेकॉर्डिंग आहे, स्टुडिओत ये.” मी म्हणायचो,”अण्णा थोडी तालीम करूया”. तिथून हसून उत्तर यायचं,”काही गरज नाही”, आणि फोन ठेवायचे. पण काय मधाळ चाली द्यायचे!!! संतोषी आणि राजेंद्र कृष्णची गाणी मधात बुडवून काढायचे!!!!!” परछांईमधील सगळी गाणी गाजली. शिन शिनाकी बुबलाबु मध्ये ब्लु नोट्स मध्ये त्यांनी हिंदी सिनेमामधील पहिल गाणं दिल. त्या नंतरही ब्लु नोटमधे फार कमी गाणी आली. शिनशिनाकी मधल लताने गायलेल्,”तुम क्या जानो तुम्हारी याद में” हे गाण तर चिरस्मरणीय आहे. हे गाणं गीतकार संतोषीने लिहिलं. एके काळी त्यांची फार चलती होती. ते निर्माताही होते आणि यशस्वी चित्रपट बनवले त्यांनी. रेहाना ही त्या काळची लोकप्रिय नायिका. कालांतराने संतोषी तिच्या नादी लागले. सतत तिच्याबरोबर असत, तिला बंगला घेउन दिला, पार पागल झाला माणूस!!!! काळ बदलला…संतोषींची सद्दी संपली आणि उतरता काळ सुरू झाला. मग रेहानाने संबंध तोडले, पण प्रेमवेडा संतोषी तिला भेटायला झुरू लागला, दरवाज्याबाहेर भिकर्यासारखा उभा राहिला. थंडीत एके रात्री तिला भेटायला म्हणून गेला, रेहानाने दुरूनच येताना पाहिला व दरवानाला दार बंद करून घ्यायला सांगितलं….वेडा संतोषी त्या तसल्या थंडीत रात्रभर तिच्या दाराशी पडून होता. तुम क्या जानो तुम्हारी याद में हम कितना रोए….रैन गुजारी तारे गिन गिन, चैन से जब तुम सोए……….. १९५२ च्या सुमारास अण्णा चित्रपट निर्माते झाले आणि त्यांनी झांजर हा चित्रपट बनवायला घेतला. ह्या साली त्यांचे झमेला, लहरे व प्रेमनाथनिर्मित शगूफा हे अजून तीन बोलपट आले, पण हे वर्षं लक्षात राहील ते त्यांच्या कारकिर्दीतील कदाचित सर्वात उत्कृष्ट संगीतनिर्मीतीमुळे….तो बोलपट होता..फिल्मीस्तानचा अनारकली……..पुढे एकदा बोलताना अण्णा म्हणाले होते, कि झांजर माझ होम प्रोडक्शन…अनारकलीची गाणी हिट होतील हे माहीत असत तर त्या चाली झांजरला दिल्या असत्या.. अनारकलीतील जमाना ये समझा के हम पीके आए ह्या गाण्यावर काम चालू होतं. प्रसंग असा होता की अनारकली अकबरासमोर गाणं सादर करणार अस्ते,पण एक जळणारी तिच्या पेयात दारू मिसळते.अनारकलीच्य ते उशीरा लक्षात येते आणि तो पर्यंत ती अकबराच्या दरबारात पोहोचली असते, आणि तीला गाणं सादर करायचं अस्तं आणि मदीरेचा अंमल सुद्धा लपवायचा अस्तो. शब्द चालीत अलगद बसत होते, पण मुखडयाच्या शेवटची ओळ, जमाना ये समझा के हम पीके आए…पी के आए. ह्यात एका अक्षराचं अंतर पडत होतं आणि ते कसं भराव ते सुचत नव्हत. विचार करून वैतागलेले अण्णा काहि सामान घेऊन घरी गेले. कुलूप उघडताना त्यांना उचक्या येऊ लागल्या आणि ते पुरते हैराण झाले. सामान कसंबसं आत ठेऊन पाणी प्यायले…..आणि एकदम काहीतरी सुचलं..पेटी घेऊन जमाना ये समझा के हम पीके आए (उचकी) पी के आए…असं म्हटल आणि आपला प्रश्न सुटला हे लक्षात आलं. मग लगेच लताला घेऊन रेकॉर्डींगही केल आणि दुसर्या कामात गढून गेले. मुखर्जींनी गाणं ऐकलं अणि ते पिसाळले..ही काय फालतूगिरी आहे, उचक्या बिचक्या काय टाकता असं म्हणाले. पण फिल्मीस्तानने एकदम लो बजेट ठेवल्याने त्यांना काही करता नाही आलं आणि ते गाणं त्या उचकीसकट प्रसिद्ध झालं. तेंव्हापासून बेवड्याच्या गाण्यात उचकी मस्ट झाली.

सी.रामचंद्र – भाग ३

१९५० हे साल, अप्रतिम आणि कर्णमधुर संगीताने नटलेले बोलपट तर घेउन आलच, पण त्याच बरोबर पुढील अनेक वर्षं कानसेनांना ही मेजवानी मिळत रहाणार आहे हे आश्वासनसुद्धा घेउन आलं. ह्या सालाने, नौशाद आणि रामचंद्र ह्यांच बॉक्स ऑफिसवरचं सार्वभौमत्व सिद्ध केलं, आणि शंकर-जयकिशन, मदन मोहन, रोशन, ओ.पी.नय्यर्,अनिल विश्वास आणि एस.डी.बर्मन हे संगीतकार मिळून अनेक वर्ष तृप्त करणारं संगीत देणार आहेत ह्याची खात्री सुद्धा दिली. ह्या साली अण्णांनी निराला, समाधी, संगीता आणि सरगम हे बोलपट दिले. समाधी आणि सरगम धो धो चालले. दोन्ही बोलपटात अण्णांनी वैशिष्ट्यपूर्ण पाश्चात्त्य आणि भारतीय संगीतावर आधारीत गाणी दिली.
एव्हाना सी.रामचंद्र ह्या संगीतकाराची प्रतिभा इंडस्ट्रीवाल्यांना माहीत झाली. एकाच वर्षी ४-५ बोलपट करून प्रत्येक बोलपटात चांगलं संगीत देणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. त्यामूळे सी.रामचंद्र हे नाव सर्वांना माहीत झाले. एव्हांना अण्णांची संगीतशैली सुद्धा विकसीत झाली होती. पाश्चात्य संगीतशैलीत दिलेली अथवा कव्वालीसदृश असलेली खट्याळ गाणी जी दोन, तीन वा प्रसंगी चार गायकांनी कोरस सहीत म्हटलेली. ही गाणी एकंदरीतच धमाल मूड बनवतात आणि धिंगाणा घालायचा आपला मनोदय जाहीर करतात उदा:- खिडकी मधल किस्मत हमारे साथ है जलने वाले जला करे हे कव्वाली शैलीतल गाण, अथवा चिरतरूण राहीलेली संडे के संडे आणि समाधी मधील गोरे गोरे ओ बांके छोरे ही पाश्चात्य धाटणीची गाणी आणि मेळ्यातील गाण्यांच्या शैलीतील ओ दिलवालों दिल का लगाना आणि मेरे पिया गये रंगून ही पतंगामधील गाणी त्याचीच उदाहरणे..आणि ही गाणी सादर करणारे धिंगाणा कलाकार बहुदा गोप, याकुब अथवा भगवानदादा असत. ह्या एकूण संगीतावर पाश्चात्य छाप असे आणि त्या जीवनशैलीबद्दलचे आकर्षण ह्या संगीतात प्रतिबिंबित झाल आहे असं म्हणता येईल.संगीता मधील नाउम्मीद होके भी , समाधीमधील अभी शाम आयेगी निकलेंगे तारे, वो पास आ रहे है, निरालामधील मेहेफिल में जल उठी शमा, ऐसी मुहोब्बत से हम बाज आये, जोर लगालो टूटी गाडी आणि सरगम मधील, जब दिल को सतावे गम, रे ग म ग रे सानी ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी तर मैं हू अलादीन आणि धमाल ,मैं हू एक खलासी मेरा नाम है भीमपलासी ह्या गाण्यांनी लोकाना वेडं केलं होतं. संगीतकार श्री. शंकर ह्यांनी एका मुलाखतीत म्हटल होतं की मेहेफिल में जल उठी शमा हे गाण संगीतकारांना सुद्धा आवडायचं, आणि स्वतः श्री. शंकर ह्यांनी काही गाणी त्या शैलीत बनवली.
यश पाठीशी असल तरी अण्णा आणि भगवान ह्या मित्रांत फरक नव्हता पडला. त्यांच भेटणं, दंगा मस्ती करणं , रेल्वे कँटीनमधे बसून पिणं हे चालूच होत. एकदा भगवान त्याच्या एका बोलपटाचं रश प्रिंट बघत होता आणि मागून आवाज आला, “मजा आ गया दादा!!!”…बघतो तर मागे राज कपूर. तो म्हणाला, “मला जेंव्हा जेंव्हा कळत की तुम्ही रश प्रिंट बघताय, मी पण लपून बघतो…मला खूप कल्पना मिळतात.” हे ऐकून भगवान आश्चर्यचकीत झाला. मग राज कपूर म्हणाला,”दादा कब तक ये ऐसी फिल्में करोगे? ये पीला हाउस छोडो, वर्ना लोग बोलेंगे भगवान राज कपूर को कॉपी करता है!!!”. डोक्यात किडा टाकून कपूर निघून गेला. काही दिवस गेले आणि रेल्वे कँटीनमधे पिणं जोरात चालू असताना राम एकदम म्हणाला,”भगवान यार ऐसा कुछ करते है के साला ईंडस्ट्री के इतिहाससे अपना नाम कोई नही हटा पायेगा….” भगवानला चढलेली खाडकन उतरली…पुढचे काही दिवस राज कपूर आणि रामचे ते शब्द त्याचा पाठलाग करत होते आणि अखेर ह्या अस्वस्थतेतूनच एक अजरामर बोलपट जन्मला अलबेला
१९५१ साल प्रचंड यश घेउन आलं. अलबेला, खजाना, सगाइ, संग्राम, सौदागर, शबिस्तान आणि उस्ताद पेद्रो हे तब्बल सहा बोलपट अण्णांच्या संगीताने नटले होते. अलबेलावर वेगळ लिहायची गरजच नाही…कहर चित्रपट आणि कहर संगीत. गरबा शैलीतले भोली सुरत दिल के खोटे, कॅबरेट स्टाइलचं दिवाना परवाना आणि दोन भिन्न शैलींच मिश्रण केलेलं दिवाना परवाना, अरबी शैलीतल पण रागदारीवर आधारीत मेहेफिल में मेरी कौन ये दिवाना आ गया ही गाणी तूफान गाजली. ह्या धिंगाणा गाण्याबरोबरच, वेस्टर्न शैलीत, गिटार, पियानोचे लाडीक पीसेस टाकत बनवलेलं दिल धडके नजर शरमाए , खास भरतीय शैलीतल लाडिक बलमा बडा नादान आणि कदाचित ह्यांचा कळंस धीरे से आजा रे अखियन में ही तरल आणि आईच्या मायेने व बाळाला मांडीवर झोपवताना जो ताल येतो त्या तालाने भारलेली ही अंगाई. खुद्द अण्णा म्हणाले होते की ही रचना करताना मी मुल मांडीवर घेउन कसं झोपवतात ह्याचा विचार करून त्याच लयीत ही अंगाई बांधली. खजाना मध्ये खास अण्णा-लता टीमची रचना ऐ चांद प्यार तेरा ही अनेकांना मोहवून गेली. तर सगाई मधील लता तलतचं मुहोब्बत में ऐसे जमाने भी आए हे त्यांच्या सर्वोत्तम द्वंद्वगीतात जाऊन बसल. संग्राममध्ये अरूणकुमारने गायलेल वो उनका मुस्कुराना आणि लता-चितळकर ह्यांनी गायलेले उल्फत के जादू का दिलपे असर है हि गाणी भरपूर गाजली.
शबिस्तानमध्ये विभुती मित्रा संगीतात ना़क खुपसायला लागला म्हणून तो बोलपट अण्णांनी सोडला, पण त्यांचा असिस्टंट आणि मित्र मदन मोहन संगीतकार म्हणून आल्यावर अण्णांनी मदत केली आणि संगीतकार म्हणूनसुद्धा मदनचच नाव दिल. असं म्हणतात की मदन मोहनच्य पिताश्रींनीच सी.रामचंद्रना मदनला असिस्टंट म्हणून घ्यायची विनंती केली आणि फिल्मीस्तानचं कारकिर्दीत भरीव योगदान आहे आणि वैयक्तीक संबंध म्हणून अण्णांनी स्वतःच नाव लावलं नाही. श्री मदन मोहन ह्यांच्या वेबसाईट्वर मात्र अण्णांच्या ह्या बाबींची माहीती नाही…किंबहुना मदन मोहन आणि अण्णा ह्यांचे वैयक्तीक नातं फार चांगल होत ह्याचा कुठलाही उल्लेख नाही, ही नोंद करू इच्छीतो.
एकंदरीतच सी.रामचंद्रमहीमा वाढीस लागला होता. चितळकर ह्या नावाने गायलेली गाणीही गाजू लागली. लताबरोबरचं कॉम्बीनेशन तर डेडली होतं. संगीतकार-गायक ह्यांच्यात द्वैत नसलं की काय होउ शकत ह्याचं सर्वोत्तम उदाहरण. हीच अनुभुती पुढे लता-मदन आणि आशा-नय्यर जोडीने दिली.

सीवर्डस्टोन भाग ५

तर ठरवल्याप्रमाणे अस्मादीक आमच्या सहकार्यांसोबत अमाप उत्साहाने सळसळत टेस्कोकडे निघालो. सर्वप्रथम प्रथेनुसार कसं जाव ह्यावर चर्चा झडली आणि रू., पै, आणे….चुकलो, पौंड आणि सेंट(च ना? नाही नाही पेन्स) ह्याचा हिशोब करून, शेवटी चालणे आरोग्यास उत्तम असल्याने चालत जावे असे ठरले. टेस्को लांब असेल असा माझा तर्क होता आणि मी फुकट चालत जाण्यास नाखूष होतो. परंतु बहुमतासमोर मी पड खाल्ली आणि चालायला कबूल झालो. जेमतेम २ मिनिटात मी कबूल केल की टॆक्सीने जाण्यात मजा आली नसती. वास्तविक हॊटेलला येतानाच मी तो रस्ता बघीतला होता, पण तो निसर्गसुंदर आहे हे कसा विसरलो कुणास ठाऊक!!! तो चिमुकला रस्ता, दोन्ही बाजूला पसरलेली हिरवळ आणि झाडी…अहहह…..मन मोहून टाकणारा देखावा होता.

हा रस्ता तसा छोटाच होता, पण वर्दळच कमी. पायी जाणारे तर फक्त आम्हीच होतो. सकाळच्या वेळी एव्हढी शांतता खूप छान वाटत होती. मग एकेक करत गाड्या दिसू लागल्या. अबबबब किती मॊडेल्स…निम्मी तर मी बघीतलही नव्हती. मध्येच हार्ले डेव्हिडसन वर बसून जाणारे म्हातारे दिसले, पण माझा मागसलेला कॆमेरा असल्यामुळे फोटो घेता आले नाहीत आणि काही घेतले त्यातले अनेक आले नाहीत नीट :( !!!…पण जे काही आम्ही बघीतले ते खरंच लक्षात राहिल असे होते. पुलाखालून सटासट जाणार्या गाड्या, तिथेच अस्मादिकांनी केलेले शूटींग :)

पूल ओलांडून पुढे गेलो आणि पाच मिनिटात बैठी घर दिसू लागली आणि आपण गावाजवळ आल्याचं लक्षात आलं गावाचं नाव होतं वाल्थाम ऎबे. इथेच टेस्को होतं…आमच्या आनंदास उधाण आले आणि पटापट पाय उचलत आम्ही गावात शिरलो…स्वागतालाच एक कबरस्थान होतं. ही जागा, सकाळच्या आनंदी वेळी पण उदास छाया टाकणारी वाटत होती, मग तिथे फार न रेंगाळता आंम्ही टेस्को जवळ गेलो….आणि आ वासून पहात राहीलो…..एव्हढं मोठ्ठ दुकान मी तरी आयुष्यात पाहिलं नव्हत. मग लगेच ट्रॊल्या घेऊन आम्ही आत शिरलो….दोन्ही बाजूला हारीने मांडलेली शेल्फ़्स आणि त्यात विविध वस्तू, स्टेशनरी सेक्शन मधे तर मी हरवूनंच गेलो..अखेर मुश्कीलीने पाऊल उचलून आम्ही मोठ्या आशेने खाद्यपदार्थ सेकशन मधे गेलो.

तिथे सुद्धा सर्व वस्तु इतक्या छान मांडल्या होत्या की विकत घ्यायचा मोह व्हावा!!सुरूवातीला, वा! हे आहे का? अरेच्या! हे पण आहे इ.इ. ह होता होता, आम्हाला जाणवलं की ईथे चणे आहेत, पण आपल्याला दात नाहीत….म्हंजे सामान तर सगळ आहे….पण शिजवणार कुठे??? खिन्न होऊन आम्ही इथे तिथे फिरू लागलो..नशीबाने काही रेडी टू ईट मिळाली…पण ती केवळ नाईलाज म्हणून घेतली. आम्ही आता एव्हढे निराश झालो की मरू दे म्हणून आम्ही कॆब केली आणि इन मधे परत आलो.